Gen-Z Protest Jayant Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gen-Z Protest Jayant Patil : 'Gen-Z' आंदोलनाच्या मागण्या रास्त; झाले-गेले विसरा, त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या; जयंत पाटलांच्या सत्ताधारी-विरोधकांना कोपरखळ्या

Jayant Patil urges parties to address Gen-Z concerns despite protest controversy : श्रीरामपूरातील पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात सत्ताधारींसह विरोधकांनाही सुनावले; मुद्रित माध्यमांच्या विश्वासार्हतेवरही व्यक्त केले मत

Pradeep Pendhare

Journalism Awards Shrirampur : 'Gen-Z'चे आंदोलन संपले असले तरी त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न अद्याप कायम आहेत.

आंदोलनादरम्यान वापरलेली भाषा मागे ठेवून त्यांच्या रास्त मागण्यांकडे सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

श्रीरामपूर (Shrirampur) नगरपरिषदेच्यावतीने आयोजित (स्व.) वसंतराव देशमुख स्मृती जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून बोलताना जयंत पाटील म्हणाले, "'Gen-Z'चे आंदोलन संपले आहे. त्यांनी काय केले, काय बोलले हे मागे सोडून त्यांचे प्रश्न काय आहेत, हे समजून घेणे गरजेचे आहे. त्यांनी शिवराळ भाषा वापरली असेल, पण त्यांच्या मागण्या रास्त होत्या. त्या समजून घेण्यात सत्ताधारी पक्षांसह विरोधकांनाही अपयश आले. पोरे आपलीच आहेत, त्यामुळे झाले-गेले विसरून त्यांच्या प्रश्नांकडे सर्वांनी लक्ष द्यावे."

या कार्यक्रमाला माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), पत्रकार यदू जोशी, आमदार हेमंत ओगले, माजी आमदार भानुदास मुरकुटे, नगराध्यक्ष करण ससाणे, उपनगराध्यक्षा कांचन सानप, मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जयंत पाटील यांनी पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपावरही भाष्य केले. डिजिटल माध्यमांची स्पर्धा वाढली असली तरी मुद्रित माध्यमांची विश्वासार्हता आजही टिकून असल्याचे त्यांनी नमूद केले. शोधपत्रकारिता अधिक प्रभावी होण्यासाठी पत्रकारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता सत्य लोकांसमोर आणावे, असे आवाहन त्यांनी केले.

बाळासाहेब थोरात यांनी (स्व.) वसंतराव देशमुख यांच्या लोकाभिमुख पत्रकारितेचा गौरव करत, आजच्या रील्सच्या युगातही मुद्रित माध्यमांची विश्वासार्हता कायम असल्याचे सांगितले. पत्रकारांनी निर्भीड पत्रकारितेद्वारे लोकशाही अधिक सक्षम करण्याची भूमिका निभावावी, असेही ते म्हणाले.

पत्रकार यदू जोशी यांनी पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर भर देताना, पत्रकार हा कोणत्याही राजकीय पक्षाचा मित्र नसावा, असे स्पष्ट मत व्यक्त केले. लोकशाही मजबूत राहण्यासाठी सक्षम विरोधी पक्ष आणि स्वतंत्र पत्रकारिता तितकीच आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारांच्या आरोग्य, निवास आणि सामाजिक सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजनांची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पहाटेच्या शपथविधीची आठवण

यदू जोशी यांनी राहाता, संगमनेर आणि कोपरगावच्या राजकीय संबंधांवर मिश्किल टिप्पणी केली. त्यावर बाळासाहेब थोरात यांनी, "आम्ही तसे केले तर पत्रकारांना बातमीच मिळणार नाही," अशी कोपरखळी लगावली. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी "राजकारणात अशक्य काहीच नाही," अशी जोड दिली. त्यानंतर जोशी यांनी पहाटेच्या शपथविधीची आठवण करून देत उपस्थितांमध्ये हशा पिकवला.

जयंतराव, तुम्ही कुठेही जाऊ नका

याचवेळी यदू जोशी यांच्या 'Gen-Z'वरील भाषणाचा संदर्भ घेत बाळासाहेब थोरात यांनी "जोशी यांचे भाकीत कधीच चुकत नाही. त्यामुळे तीन वर्षांनी काँग्रेसचे सरकार येणार असल्याने जयंतराव, तुम्ही कुठेही जाऊ नका," या वक्तव्याने सभागृहात एकच हशा पिकला.

पुरस्कार वितरण

या सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार महादेव कुलकर्णी यांना 'जीवनगौरव' पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच अशोक निंबाळकर, रियाज देशमुख, मच्छिंद्र देशमुख, दादासाहेब म्हस्के, दिलीप खरात आणि नीलिमा घाडगे यांचाही सन्मान करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT