Sangamner political news : संगमनेर तालुक्यातील संवेदनशील आणि काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहे थोरात यांचे प्राबल्य असलेल्या घुलेवाडी ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंचांसह पाच सदस्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे.
सरकारी जागेवर अतिक्रमण करून त्याचा लाभ घेतल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी हा निर्णय दिला. या कारवाईमुळे संगमनेर तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, बाळासाहेब थोरात यांना हा राजकीय धक्का मानला जात आहे.
अपात्र ठरविण्यात आलेल्यांमध्ये सरपंच (Sarpanch) निर्मला कैलास राऊत, उपसरपंच दत्तात्रय चिमण राऊत, सदस्य अनिल बबन राऊत, बाजीराव लक्ष्मण पानसरे आणि सोनाली रवींद्र गिरी यांचा समावेश आहे.
घुलेवाडी येथील सरकारी जागेवर अतिक्रमण करून त्याचा वापर ग्रामपंचायत (Gram Panchayat) सदस्य आणि त्यांच्या नातेवाईकांकडून केला जात असल्याची तक्रार शिवसेनेचे शाखाप्रमुख शरद पानसरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.
तक्रारीनंतर गटविकास अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली. चौकशी अहवालात संबंधितांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले. तसेच त्या जागेवर बांधकाम करण्यात आल्याचेही तपासात समोर आले. विशेष म्हणजे, या बांधकामाची नोंद ग्रामपंचायत सभेतील ठरावाद्वारे करण्यात आल्याचेही उघड झाले. ही नोंद बेकायदेशीर असल्याचा दावा तक्रारदारांनी केला होता.
संबंधित सदस्यांनी वकिलामार्फत आपली बाजू मांडताना ग्रामपंचायतीचे ठराव, चौकशी अहवाल आणि विविध कागदपत्रे सादर केली. मात्र, सर्व पुराव्यांची पडताळणी केल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी संबंधित सदस्यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरविले.
घुलेवाडी ग्रामपंचायत ही संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ग्रामपंचायत मानली जाते. सहकारी साखर कारखाना तसेच अमृत उद्योग समूहाशी संबंधित अनेक सहकारी संस्था या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येतात.
ग्रामपंचायतीवर सुरुवातीपासूनच बाळासाहेब थोरात यांचा प्रभाव राहिला आहे. त्यामुळे या निर्णयाकडे केवळ प्रशासकीय कारवाई म्हणून नव्हे, तर स्थानिक राजकारणातील मोठी घडामोड म्हणून पाहिले जात आहे. काही महिन्यांपूर्वी घुलेवाडी येथे वादग्रस्त कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांच्या कीर्तनानंतर झालेल्या वाद आणि मारामारीमुळेही हे गाव राज्यभर चर्चेत आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.