Girish Mahajan
Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

धुळ्यातील स्थितीला पालकमंत्री गिरीश महाजन यांची बगल

Sampat Devgire

निखिल सूर्यवंशी

धुळे : महापालिकेच्या (Dhule) सभांमधील काही घडामोडी पाहता प्रस्तावकर्ते सत्ताधारी भाजपचे (BJP) आणि विरोध करणारेही (BJP also in Opposition) भाजपचे, असे चमत्कारिक चित्र पाहायला मिळते. निवडणुकीत ज्या आत्मविश्‍वासाने सत्ता हस्तगत केली, ५० नगरसेवक निवडून आणले तेच भाजपचे आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) आता जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहेत. त्यामुळे त्यांनी शुक्रवारी दौऱ्यावेळी साडेतीन वर्षांतील मनपा कारभाराचा आढावा घेणे अपेक्षित होते. मात्र, तसे घडले नाही. त्यांनी एका अर्थाने या मुद्द्याला बगल दिल्याची चर्चा दौऱ्यानंतर रंगली. (Girish Mahajan in power but he avoid to resolve Dhule issues)

मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी मनपाला शंभर कोटींचा निधी दिला होता. त्यातून काही कामे झाली, काही सुरू आहेत. यात पाणी योजनेचाही प्रश्‍न आहे. निवडणुकीपर्यंत कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. मध्यंतरी सरकार बदलल्याने शहर झीरो बजेट राहिले. आता नवे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या मदतीने आठ ते पंधरा दिवसात भरीव निधी महापालिकेला जाहीर होईल, असे विधानही पालकमंत्री महाजन यांनी पत्रकार परिषदेत केले. त्यानुसार त्यांनी भरीव निधी आणावा आणि शहर विकासाचा मार्ग मोकळा करावा, अशी धुळेकरांची अपेक्षा असेल. असे असताना पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात रखडलेली कामे, समस्यांचे काय हा प्रश्न‍ अनुत्तीर्णच राहिला.

शहरात नियोजनाचा अभावच

तीन वर्षांपासून रखडलेल्या भूमिगत गटार योजनेमुळे देवपूरवासीयांचा जीव अद्याप टांगणीलाच आहे. ही योजना फेल झाल्याची सार्वत्रिक भावना आहे. बहुसंख्य रस्त्यांचीही वाट लागली आहे. यात पुन्हा गॅस पाईपलाईनसाठी खोदकाम होणार आहे. यासंदर्भात कुठलेही नियोजन दिसत नाही. बारापत्थर ते संतोषीमाता चौकापर्यंतचा मॉडेल रोड अनेक वर्षांपासून होतच आहे. त्याचे नेमके मॉडेलपण काय हेच धुळेकरांना अद्याप कळालेले नाही. वाट लागलेल्या या वर्दळीच्या मार्गामुळे धुळ्याची शोभा होते. या मार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांकडे लक्ष वेधत भाजपच्या माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेविका कल्याणी अंपळकर यांनी आंदोलन केले. दोन दिवसात हा मार्ग ठीकठाक करू, असे मनपाने सांगितले. ते दोन दिवस केव्हा येणार हा प्रश्‍न आहे.

पाण्यासह विविध प्रश्‍न भिजत

अक्कलपाडा योजनेने दिवाळीनंतर एक दिवसाआड पाणीपुरवठा करू, असे आश्‍वासन भाजपने दिले होते. मुबलक जलसाठा असूनही महिन्यातून फक्त पाच दिवस पाणी मिळते आहे. परंतु, वर्षाची पाणीपट्टी वसूल केली जात आहे. नळधारक नसलेल्यांकडून मोगलाई पद्‌धतीने पाणीपट्टी वसूल केली जाते. हे कुठल्या नीतिमूल्यांच्या चौकटीत बसते? कचरा संकलन, स्वच्छता, रस्त्यांच्या दुतर्फा व इतरत्र वाढते अतिक्रमण, हॉकर्स झोन, मोकाट जनावरांचा प्रश्‍न लवकर सुटेल, असे धुळेकरांना वाटत नाही. यात जुन्या इमारतीतून महापालिका नव्या इमारतीत स्थलांतरित होणे, इतकाच काय तो बदल दिसतो आहे. यासंदर्भात पालकमंत्री महाजन यांनी पारदर्शकतेने ही स्थिती जाणून घेणे अपेक्षित आहे.

शहरावर डोळा, पण मुद्दे काय?

भाजपचा धुळे शहर मतदारसंघावर डोळा आहे. पण मनपातील सत्ताधारी व नेते कुठले मुद्दे निवडणुकीवेळी मांडणार आहेत? भाजपने मनपाची सत्ता हस्तगत केल्यापासून समोर आलेले प्रश्‍न, मुद्दे विरोधात जाणारे आहेत. साकल्याने विचार केला तर प्रसारमाध्यमांनी मांडलेले मुद्दे विरोधातील समजू नये, तर धुळेकरांच्या अडचणी, समस्या आणि वचन, कर्तव्यपूर्तीची भावना जोपासली गेली तर आगामी काळ भाजपला सोपा ठरणारा असू शकेल

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT