Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan : गिरीश महाजन भाजपच्याच मंत्र्याची कॉपी करायला गेले अन् डाव अंगलट आला : संकटमोचकच संकटात

Jamner election controversy : गिरीश महाजन यांच्या कार्यकर्त्यांनी जामनेरमध्ये निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधी उमेदवारांवर माघारीसाठी दबाव आणल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

Ganesh Sonawane

Jamner municipal election : भाजपचे राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांच्या धुळे जिल्ह्यातील दोडाईंचा नगरपरिषद पूर्णपणे बिनविरोध करुन दाखवली आहे. दोंडाईचा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासह संपूर्ण २६ जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. मंत्री रावल यांनी एकप्रकारे इतिहासच घडवला आहे. रावल यांचा हाच दोंडाईचा पॅटर्न जामनेरमध्ये राबविण्याचा प्रयत्न मंत्री गिरीश महाजन यांनी केला. पण ते त्यांच्या चांगलच गळ्यात आल्याचं दिसतं.

जळगाव जिल्ह्यात १६ नगर परिषद व दोन नगर पंचायती अशा अठरा ठिकाणी निवडणुका होणार आहेत. पण यातील एकाही ठिकाणी महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये कुठेच युती होऊ शकलेली नाही. बऱ्याच ठिकाणी भाजप एकाकी पडल्याचे चित्र आहे. अशात मंत्री महाजन यांनी आपल्या मतदारसंघात जामनेर नगरपरिषद निवडणुकीत दोंडाईचा प्रमाणे बिनविरोध निवडणूक पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न केला पण तो त्यांच्या अंगाशी आला.

ऐरवी कार्यकर्त्यांच्या हिताची गोष्ट करणाऱ्या महाजन यांनी जामनेरमध्ये त्यांच्या एखाद्या कार्यकर्त्याला नव्हे तर त्यांच्या पत्नी साधना महाजन यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. पण महाजन यांना जामनेरमध्ये अडकून पडायचं नव्हतं. त्यांनाही मंत्री रावल यांच्याप्रमाणे निवडणूक बिनविरोध करुन मोकळं व्हायचं होतं. म्हणून त्यांनी दोंडाईचा नगर परिषदेप्रमाणे जामनेरमध्ये नगराध्यक्षांच्या विरोधातील सर्व उमेदवारांना माघार घेण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांच्या पत्नी साधना महाजन बिनविरोध निवडून आल्या.

पण तेवढ्यावरच न थांबता भाजपकडून नगरसेवकपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या सर्व उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्याचे प्रयत्न मंत्री महाजन यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केले. त्यासाठी विरोधातील उमेदवारांवर भाजप कार्यकर्त्यांकडून दादागिरी करत दबाव टाकण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते गौरव दिलीप खोडपे यांनी केला. अर्थात खोडपे यांचे म्हणणे आहे की, ते महाजन यांच्या सांगण्यानुसारच झाले. माघारीच्या शेवटच्या दिवसांपर्यंत भाजपच्या ९ नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली होती. अखेरच्या दिवशी दोन उमेदवार माघारीसाठी उशीरा पोहोचले पण जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी त्यात खोडा घातला.

काल जामनेरमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात काही कार्यकर्ते एका उमेदवाराला कॉलरला पकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासमोर नेतात आणि अर्ज मागे घ्यायला लावतात. हे कार्यकर्ते भाजपचे असल्याचा दावा खोडपे यांनी केला. महाजन यांनी सांगितल्याशिवाय कार्यकर्ते असे करणार नाहीत असा आरोप खोडपे यांनी केला आहे.

तसेच जामनेर मधील प्रभाग क्रमांक चार मधील उमेदवार जावेद मुल्ला यांचाही एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यातही त्यांनी भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपकडून माघार घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भाजप नेत्यांच्या भीतीने काही उमेदवारांना घेऊन त्यांना रात्रभर बाहेर राहून प्रवास करावा लागल्याचं त्यांनी म्हटंल आहे.

भाजपने सत्तेसाठी विरोधी उमेदवारांवर माघार घेण्यासाठी दादागिरी व दमदाटी केल्याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आता विरोधकांनी केली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. भाजपने कोणावरही दबाब टाकलेला नाही किंवा दमदाटी केलेली नाही. विरोधक केवळ कांगावा करत असल्याचं महाजन यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT