

Nashik Politics : विधानसभेला नांदगाव मतदारसंघातून गणेश धात्रक यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी केली होती. त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. दुसऱ्या स्थानावर अपक्ष लढलेले समीर भुजबळ होते. तर शिवसेना (शिंदे गट) चे सुहास कांदे विजय झाले होते.
शिवसेनेच्या विभागणीनंतर सुहास कांदे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत गेले. त्यामुळे नांदगाव-मनमाडमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची सर्व दारोमदार गणेश धात्रक यांच्यावर होती. असे असताना विधानसभेला पराभव झाल्यानंतर धात्रक यांनी भाजप प्रवेश केल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. पण धात्रकांचा भाजप प्रवेशही पूर्णपणे फेल गेला आहे.
मनमाड नगरपालिका निवडणुकीत भाजपने सुहास कांदे यांच्यासोबत युती जाहीर केली. त्यावेळी धात्रक हे भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी इच्छुक होते. पण भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या युतीमध्ये थेट नगराध्यक्षपदाची जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला दिली गेली. सुहास कांदे यांनी त्यांच्या मर्जितला व पक्षाचा उमेदवार नगराध्यक्षपदासाठी उभा केला. त्यामुळे धात्रक यांचा पत्ता कट झाला. भाजपने त्यांना उमेदवारी दिली नाही. पक्षाने उमेदवारी न दिल्याने धात्रक नाराज होते.
धात्रक यांनी भाजप आणि अपक्ष असे दोन्ही अर्ज भरले होते. पण भाजपने त्यांना एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळे धात्रक यांचा पक्षाचा अर्ज अवैध ठरला. तर माघारीच्या शेवटच्या दिवशी धात्रक यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज देखील मागे घेतला. त्यामुळे धात्रक हे नगरपालिकेच्या निवडणुकीतून पूर्णत: बाहेर फेकले गेले आहेत.
धात्रक यांना आपल्याच पक्षाने म्हणजे भाजपने साथ न दिल्याने त्यांच्यावर माघारीची वेळ आली. त्यातूनच त्यांचा करेक्ट कार्यक्रम झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. पक्षाने साथ न दिल्याने अपक्ष लढण्याची तयारी केलेल्या धात्रकांनी माघारीच्या शेवटच्या दिवशी नांगी टाकल्याने आमदार सुहास कांदे यांच्या उमेदवाराचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.
मनमाड नगरपालिकेसाठी भाजप शिवसेना युती होऊनही भाजपच्या वाट्याला मोजक्या जागा आल्या. भाजपमधील अनेक धात्रक समर्थकांना त्यामुळे उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे अनेक धात्रक समर्थकांनी समीर भुजबळांना साथ देत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. समर्थकांपाठोपाठ धात्रकांचीही तशीच अवस्था झाली आहे. ते आता काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
गणेश धात्रक यांचे वडील जग्गनाथ धात्रक हे १९८० व १९९० मध्ये दोनवेळा आमदार होते. आई पद्माताई धात्रकदेखील माजी नगराध्यक्ष राहिल्या आहेत. गणेश धात्रक यांनी स्वत: दोनवेळा नगराध्यक्षपद भूषविले आहे. धात्रक हे गेल्या 26 वर्षांपासून मनमाड पालिकेत नगरसेवक म्हणूत कार्यरत होते. मनमाड नगरपालिकेत गणेश धात्रक म्हणतील ती पूर्व दिशा होती. मग आता धात्रक इतके हतबल का झाले? मनमाडचा हा मजुबत नेता निवडणुकीतून बाहेर कसा पडला. धात्रकांचा करेक्ट कार्यक्रम नक्की कशामुळे झाला हा मोठा सवाल आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.