Devendra Fadnavis, Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan : महाजनांचे हात झटकण्याचे दिवस गेले! गळ्यात पालकमंत्रीपदाची माळ पडली, पण डोक्यावर काटेरी मुकुटही आला

Girish Mahajan, Nashik Guardian Minister : कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची अखेर नाशिकच्या पालकमंत्रीपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते अघोषित पालकमंत्री म्हणून कारभार पाहत होते. कुंभमेळा मंत्री म्हणून नाशिकमध्ये त्यांचा वावर होता.

Ganesh Sonawane

Nashik Guardian Minister : गेल्या दीड वर्षांपासून रखडलेल्या नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, सध्याची नाशिकमधील परिस्थिती पाहता हे पद केवळ राजकीय प्रतिष्ठा मिरवण्यापुरते राहिलेले नाही; उलट महाजनांच्या डोक्यावर काटेरी मुकुट ठेवला गेला आहे.

यापूर्वी कुंभमेळा मंत्री म्हणून महाजनांकडे सिंहस्थाच्या नियोजनाची जबाबदारी होती. आता पालकमंत्रीपदामुळे ही जबाबदारी आणखी व्यापक झाली आहे. कुंभमेळ्याची कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यापासून ते शहरातील मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यापर्यंत महाजनांना अनेक आघाड्यांवर काम करावे लागणार आहे. पालकमंत्री पद मिळाल्याने नाशिकच्या प्रश्नांची अधिकृत जबाबदारी महाजन यांच्यावर आली असून आता त्यांना या जबाबदाऱ्यांपासून हात झटकता येणार नाही.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये हजारो कोटींची विकासकामे सुरू आहेत. शहरातील रस्ते, वाहतूक, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांशी संबंधित कामांचा मोठा व्याप प्रशासनासमोर आहे. त्यातच अनेक ठिकाणी सुरू असलेली खोदकामे, अर्धवट कामे आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नाशिककर त्रस्त आहेत. खड्ड्यांमुळे अपघात होऊन तब्बल सात निष्पाप व्यक्तींचा जीव गेला आहे. नाशिकच्या या अवस्थेला मंत्री महाजन हेच जबाबदार आहेत. आता अधिकृतपणे या सगळ्या समस्यांचे पालकत्वही त्यांच्या खांद्यावर आले आहे.

विरोधकांसह अगदी महायुतीमधील घटक पक्षांनी देखील नाशिकमधील खड्ड्यांच्या प्रश्नांवरुन महाजनांना टार्गेट केलं. शिवसेना उबाठा, कॉंग्रेस या विरोधी पक्षांसह अगदी सत्तेतील राष्ट्रवादी-शिवसेनेची देखील शहरात आंदोलने झाली. मंत्री छगन भुजबळ यांनी तर थेट महाजनांना लक्ष्य केलं होतं. कुंभमेळा आमच्या लोकांच्या मुळावर येता कामा नये असा हल्लाबोल महाजनांवर केला होता. मंत्री दादा भुसे यांनीही खड्ड्यांच्या प्रश्नांवरुन एका बैठकीत नाराजी व्यक्त केली होती. सगळ्या बाजूंनी महाजन घेरले गेले.

मात्र, त्यावेळी गिरीश महाजन हे केवळ कुंभमेळा मंत्री होते, नाशिकचे पालकमंत्री नव्हते. मात्र, आता पालकमंत्रीपदाचा मुकूट महाजनांच्या डोक्यावर आल्याने विरोधकांची धार सुद्धा तितकीच तीव्र होणार असून महाजनांना त्याला तोंड द्यावे लागणार आहे. गिरीश महाजनांच्या डोक्यावर खापर फोडायला विरोधकांना भक्कम कारण मिळालं आहे. महाजनांनी विरोधकांसह महायुतीतील घटक पक्षांमधील विरोधकांना थोपवत नाशिकचं पालकमंत्रीपद मिळवलं खरं पण त्यातून महाजनांपुढील संकटे आणखी वाढली आहेत.

शहरात कुंभमेळ्याची ३४ हजार कोटींची कामे सुरु आहेत. ३१ मार्च पर्यंत ही सर्व कामे पूर्ण करण्याचे आव्हान आता महाजनांपुढे आहे. पालकमंत्री झाल्याने जिल्हा नियोजन किंवा इतर प्रश्नांच्या बाबतीत महाजनांना आता हात झटकता येणार नाही. कमी कालावधीत ही सर्व कामे त्यांना मार्गी लावावी लागणार आहे. नाशिकरांचा राग महाजनांना शांत करावा लागणार आहे. शहरातील सर्व प्रश्नांची थेट राजकीय जबाबदारी आता पालकमंत्री म्हणून महाजनांच्या खांद्यावर येणार आहे.

त्यामुळे नाशिकचे पालकमंत्रीपद मिळणे ही महाजनांसाठी राजकीय ताकद वाढवणारी बाब असली, तरी त्याचवेळी ती त्यांच्या कार्यक्षमतेची मोठी कसोटीही ठरणार आहे. नाशिकमध्ये आता जे चांगले घडेल त्याचे श्रेय महाजनांना मिळेल; मात्र जे रखडेल, बिघडेल किंवा नागरिकांच्या रोषाला कारणीभूत ठरेल, त्याची जबाबदारीही त्यांनाच घ्यावी लागेल. म्हणूनच नाशिकच्या पालकमंत्रीपदाची माळ महाजनांच्या गळ्यात पडली असली, तरी त्यासोबत काटेरी मुकुटही त्यांच्या डोक्यावर आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT