

Nashik Politics : काल देशभरात मोठ्या उत्साहात भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा झाला. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त नाशिकमध्येही विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारात जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ उत्साहात संपन्न झाला. पण काल घडलेल्या एका प्रसंगाची सध्या नाशिकमध्ये चर्चा असून विरोधकांनीही हा मुद्दा उचलला आहे.
नाशिकला आजून अधिकृत पालकमंत्री मिळालेला नाही. म्हणून नाशिकमध्ये मुख्य शासकीय ध्वजारोहण कोण करणार याची उत्सुकता होती. अखेर राज्याच्या सामन्य प्रशासन विभागाने जाहीर केलेल्या यादीनुसार नाशिकमध्ये ध्वजारोहण करण्याचा मान यंदाही मंत्री गिरीश महाजन यांनाच मिळाला. त्यासाठी काल ते नाशिकमध्ये आले होते.
मंत्री गिरीश महाजन हे स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन करण्यासाठी नाशिकमध्ये आले खरे पण एक गडबड झाली. माध्यमांशी बोलताना, मंत्री गिरीश महाजन यांचा एक प्रश्न ऐकुन सर्वच जण बुचकाळ्यात पडले. नेमका कितवा स्वातंत्र्यदिन आहे, हेच गिरीश महाजन यांना आठवत नव्हते. मग त्यांनी लगेच तत्काळ आपल्या शेजारी उभ्या असलेल्या नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांची मदत घेतली.
झेंडावंदनाला नाशिकमध्ये आलेले मंत्री गिरीश महाजन हा कितवा स्वातंत्र्यदिन आहे हेच विसरले. मग त्यांनी जरा इकडं -तिकडं नजर टाकली. शेजारीच नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर- आडके उभ्या होत्या, महाजनांनी थेट त्यांना प्रश्न केला हा कितवा स्वातंत्र्य दिन आहे? महापौरांनी लागलीच महाजनांना कानात योग्य उत्तर सांगितलं. हा 80 वा स्वातंत्र्य दिन असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री महाजनांचे कन्फ्युझन होऊ नये यासाठी महापौरांनी अगोदर ८० असं मराठीत आणि त्यानंतर Eighty असं इंग्रजीत दोन्ही प्रकारे सांगितलं. मग त्यावर गिरीश महाजन यांचं समाधान झाल्याचं दिसलं. यावेळी दोघांमधील हा संवाद साहजिकच माध्यमांच्या कॅमेऱ्यात आणि माईकमध्ये कैद झाला. त्यामुळे संकटमोचकांच्या मदतीला नाशिकच्या महापौर संकटमोचक बनून धावून आल्याची चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात रंगलीय.
संजय राऊतांनी साधली संधी...
मंत्री महाजन कदाचित कामाच्या धावपळीत कितवा स्वातंत्र्यदिन आहे हे विसरले असतील, पण यावर विरोधकांनी संधी साधली नसती तरच नवल. याच मुद्द्यावरुन शिवसेना उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना मंत्री महाजन यांना टोला लगावला. ज्या मंत्र्याला हा कितवा स्वातंत्र्यदिन आहे, हे विचारावं लागतं त्यांचा स्वातंत्र्याशी काय संबंध? असा सवाल राऊतांनी केला. नाशिकचे चंपतराय, असा उल्लेख करत त्यांनी महाजन यांच्यावर नाव न घेता टीका केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.