Girish Mahajan news: भारतीय जनता पक्षाचे संकट मोचक अशी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिमा आहे. ही प्रतिमाच आता त्यांची वैरी होते की काय? अशी स्थिती आहे. जामनेर विधानसभा मतदारसंघात सध्या तशी राजकीय पावले त्या दिशेनेच पडत आहेत.
ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन गेल्या दहा वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये राज्यात मंत्री आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून ते परिचित आहेत. महाराष्ट्रातील पक्षाचे संकट मोचक अशी जाणीवपूर्वक प्रतिमा त्यांनी निर्माण केली आहे.
सध्याच्या जामनेर विधानसभा निवडणुकीच्या राजकारणात ज्या पद्धतीने विरोधक आडाखे बांधत आहेत. त्याचा विचार करता यंदाची निवडणूक मंत्री महाजन यांना नेहमीसारखी सोपी नसेल. त्यामुळे त्यांच्या राजकीय अडचणीत भर पडण्याची चिन्हे आहे.
यासंदर्भात महाजन यांचा पक्षातील दबदबा आणि त्यामुळे वाढलेला आत्मविश्वास देखील कारणीभूत ठरण्याची चिन्हे आहेत. आपल्याला विरोधकच नको या भूमिकेतून त्यांनी मतदारसंघातील गजाननराव गरुड शिक्षण संस्थेचे प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संजय गरुड या आपल्या पारंपारिक विरोधकाला यंदा फोडले.
आता श्री गरुड भारतीय जनता पक्षात आहेत. श्री गरुड मंत्री महाजन यांचे परंपरागत विरोधक होते. त्यांनी २००९ आणि २०१९ मध्ये महाजन यांच्या विरोधात उमेदवारी केली होती. मात्र त्यांचा मतदारसंघावर मर्यादित प्रभाव होता.
मंत्री महाजन यांनी गरुड यांना भारतीय जनता पक्षात घेतले. त्याचा उलटा परिणाम त्यांच्या निकटवर्तीयांवर झाला आहे. आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गिरीश महाजन यांच्या भोवती राजकीय फास आवळायला सुरुवात केली आहे. या राजकीय चक्रव्यूहात मंत्री महाजन अडकण्याची शक्यता आहे.
सध्या मंत्री महाजन यांच्यावर त्यांचाच राजकीय डाव उलटविण्याची तयारी शरद पवार यांनी केली आहे. मंत्री महाजन यांचे निकटवर्तीय, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि मराठा समाजाचे नेते दिलीप खोडपे हे शरद पवार यांच्या संपर्कात आहेत. सध्या शरद पवार आणि खोडपे यांच्या निकटवर्ती यांचा संवाद सुरू आहे.
हा संवाद यशस्वी झाल्यास खोडपे हे आगामी विधानसभा निवडणुकीत महाजन यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार असतील. श्री. खोडपे हे मराठा समाजाचे नेते आहेत. जामनेर मतदारसंघात एक लाख चाळीस हजार मराठा समाजाची मते आहेत. या उलट मंत्री महाजन यांचा समाज अल्पसंख्यांक आहे.
मंत्री महाजन सत्तेत असल्यामुळे अनेक दृश्य आणि अदृश्य विरोधक तयार झाले आहेत. या सर्व विरोधकांची मोट बांधण्याचे काम देखील अदृश्य शक्ती कडून सुरू आहे. त्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी भूमिका आहे.
मंत्री महाजन १९९५ पासून सलग सहा वेळा जामनेर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. यात दहा वर्षे ते मंत्री आहेत. या सबंध कालावधीत अँटी इन्कमबन्सी मतदारसंघात निर्माण झाली आहे. महाजन यांच्यात देखील एक राजकीय ऑरोगन्सी तयार झाली आहे. त्यामुळे अनेक लोक दुरावले.
जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यापासून तर अनेक नेत्यांशी मंत्री महाजन यांनी उघड शत्रुत्व घेतलेले आहे. या नेत्यांच्या समर्थकांमध्ये महाजन यांच्या विषयी सहानुभूती नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या स्थितीचा योग्य लाभ उठविण्याची तयारी पूर्ण केली आहे. शरद पवार यांनी रचलेला चक्रव्यूह यशस्वी झाल्यास मंत्री महाजन यांच्यासाठी गेल्या सहा निवडणुकांसाठी यंदाची निवडणूक नसेल हे मात्र नक्की.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.