Nashik Politics : नाशिक महापालिकेत १२२ पैकी ७२ जागा एकट्या भाजपच्या असल्याने भाजपकडे पूर्ण बहुमत होते. बहुमतापेक्षा दहा जागा भाजपकडे अधिक होत्या. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांच्या म्हणण्याप्रमाणे भाजपला कुणाच्या कुबड्यांची गरज नव्हतीच. परंतु तरीही शिवसेना शिंदे गटाला उपमहापौरपद भाजपने दिले. शेवटच्या क्षणाला भाजपने शिवसेनेला जवळ केले ते काही उगीच केले नाही. त्यामागे भाजपचे वेगळे गणित होते. शिवसेनेला सत्तेत सोबत घेऊन भाजपने एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत.
शिवसेनेला सोबत घेऊन भाजपने प्रबळ विरोधी पक्षच संपवला आहे. नाशिकमध्ये आगामी कुंभमेळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी बाकावरील धार कमी करण्याचा डाव भाजपने टाकला. शिवसेना शिंदे गटाला सत्तेत सोबत घेऊन विलास शिंदे यांना उपमहापौर केलं. त्यापाठोपाठ (राष्ट्रवादी अजित पवार गट)नेही भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. दोन्ही मित्र पक्ष निवडणुकीत विरोधात लढले मात्र तरीही सत्ता स्थापनेत त्यांना सहभागी करुन घेत भाजपने मोठ्या भावाची भूमिका निभावली. युती धर्माचे पालन केल्याचा संदेशही दिला.
शिंदेंची शिवसेना विरोधी बाकावर बसली असती तर भाजपसाठी ती डोकेदुखी ठरली असती. मात्र आता शिंदे सेनेला सत्तेत वाटा दिल्याने केवळ १५ नगरसेवक असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे विरोधी पक्षनेते पद गेलं आहे. भाजपला मोठा विरोधी पक्ष नको होता आणि शिवसेना शिंदे गटाला सत्तेत घेऊन भाजपने ती खेळी यशस्वी केली आहे.
वास्तविक भाजपने मच्छिंद्र सानप यांच्या नावाची घोषणा उपमहापौरपदासाठी केली होती. त्यांचा एकमेव अर्जही पक्षातर्फे भरला होता. मात्र ऐनवेळी सानप यांना पक्षश्रेष्ठींनी अर्ज माघार घ्यायला सांगितला. शिवसेना शिंदे गटाचे विलास शिंदे यांना मतदान करण्याचा व्हीप भाजपकडून आपल्या नगरसेवकांना बजावण्यात आला. भाजपचे ७२ शिवसेनेचे २६, राष्ट्रवादीचे ४ व एक अपक्ष, एक मनसे नगरसेवकास सत्तेत सहभागी करुन घेत भाजपने आपला शंभरपारचा नारा पूर्ण केला. यातून भाजप महायुतीचे संख्याबळ वाढले.
दुसरीकडे, महापालिकेत भाजपचे ७२ सदस्य आहेत. एकूण सदस्यांच्या दहा टक्के सदस्य नियुक्त केले जात असल्याने भाजपचा गुणांक ५.९० होतो. त्यामुळे भाजपचे सहा सदस्य स्वीकृत होतील. शिवसेना व मनसेचा गुणांक २.२१ होत असल्याने दोन स्वीकृत जातील. शिवसेनेला सोबत घेतल्याने स्विकृत सदस्य सत्तेत वाढतील हेही भाजपने लक्षात घेतलं. शिवसेना व मनसेच्या उमेदवार मयुरी पवार यांच्या तसेच राष्ट्रवादी व अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांच्या एकत्रित गटनोंदणीचा फायदा होणार आहे.
तसेच स्थायी समिती ही मनपाची तिजोरी असते. शिवसेनेला सोबत घेतल्याने स्थायी समितीवर भाजपचे वर्चस्व आणखी वाढले आहे. भाजप- शिवसेना व राष्ट्रवादी युतीचे मिळून स्थायी समितीवर जास्त सदस्य जातील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.