Jalgaon Political News : जळगाव जिल्ह्यात भाजपनेते, मंत्री गिरीश महाजनांनी काँग्रेसनंतर राष्ट्रवादी काँग्रेसलाही सुरूंग लावला. काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटलांनंतर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते संजय गरुड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेश कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाजनांवर मोठी जबादारी टाकण्याचे सूचक विधान केले आहे. यामुळे आता महाविकास आघाडीतील कोणता मोठा नेता भाजपच्या गळाला लागणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.
गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी उल्हास पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यापासून आणखी एक भूकंप होणार असल्याचे सांगत होते. त्याचा प्रत्यय राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संजय गरुड यांच्या रुपाने आला आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत संजय गरुड, विलास राजपूत, माधव चव्हाण, स्नेहदीप गरुड आदींसह काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी फडणवीसांनी महाजनांवर मोठी जाबाबदारी टाकणार असल्याचे जाहीर केले.
फडणवीस म्हणाले, गिरीश महाजन राज्यात वेळ देत होते. दरम्यान, पक्षाने त्यांना राजस्थान, पश्चिम बंगालमध्ये पाठवले. राज्यात कुठे आंदोलन झाले, की तेथे गिरीशभाऊ पहिल्यांदा हजर होतात. आता त्यांना मतदारसंघात हजर राहण्याची काहीच गरज नाही. निवडणूक आली म्हणून त्यांना त्यांच्या किल्ल्यात फिरण्याची गरज नाही. त्यांची मतदारांशी नाळ चांगली जुळली आहे. त्यामुळे त्यांच्यामागे आणखी काही दोन-तीन कामे लावून देतो, असे म्हणताच कार्यक्रमस्थळी एकच हशा पिकला. यावर, आपल्या राज्याच्या विकासासाठी महाजनांना निश्चितच अधिकचे काम देता येईल, असे स्पष्ट केले.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे ३० वर्षांपासूनचे सहकारी उल्हास पाटील आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय गरुड यांच्या रुपाने मोठी ताकद भाजपमध्ये आली आहे. आता फडणवीसांच्या विधानानंतर महाजन महायुतीतील कोणत्या नेत्यासाठी गळ टाकणार, याचीच चर्चा सुरू झाली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यावेळी फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, आज एक जांबे पॅटर्न निर्माण केला. आयुष्यभर एकमेकांविरोधात लढणारे असे दोन नेते एकत्र आले. ते कार्यकर्ते, समाज, राज्य आणि देशाच्या हितासाठी एकत्र आले आहेत. काळ या निर्णयाची परीक्षा घेईल, त्यावेळी तुम्हाला पश्चात्तापाची वेळ येणार नाही. यापूर्वी तुमच्यावर अन्याय होत होता. आता तुम्हाला नाराज होऊ देणार नाही. प्रत्येकाच्या आशा, आकांक्षांना योग्य स्थान देऊ, असा विश्वासही फडणवीसांनी गरुडांना दिला.
(Edited by Sunil Dhumal)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.