Kolhapur News: 'गोकुळ'चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या पदाची आज मुदत संपणार आहे. अध्यक्ष निवडीच्या राजकीय हालचाली थंडावल्या असताना विद्यमान अध्यक्ष डोंगळे यांनी राजकीय भूकंप घडवत अध्यक्षपदाचा राजीनामा न देण्याचे स्पष्ट केले आहे. हा वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांना धक्का समजला जातो.
पंचवीस वर्षांची सत्ता असलेल्या महाडिक गटाला सुरुंग लावण्यासाठी पाटील-मुश्रीफ गटाने डोंगळे आणि माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांना सोबत घेतले तेच नेते आता या दोघांना कोंडीत पकडण्याच्या प्रयत्नात आहेत. दरम्यान डोंगळे यांच्या भूमिकेमागे जिल्ह्यातील आणि राज्यातील वरिष्ठ नेत्यांचा अदृश्य हात आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सतीश पाटील यांनी केलेला विरोधातील प्रचार त्याला कारणीभूत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या दोन निवडणुकीतील उट्टे काढण्याची संधी महायुतीला चालून आली आहे. आता गोकुळच्या राजकारणात पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार प्रा. संजय मंडलिक, डॉ. विनय कोरे हे निर्णायक भूमिकेत असतील.
जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या ‘गोकुळ’वर माजी आमदार महादेवराव महाडिक, कै. पी. एन. पाटील व अरुण नरके यांची गेली अनेक वर्षे एकहाती सत्ता होती. या सत्तेच्या जोरावर महाडिक यांच्याकडून लोकसभा, विधानसभेसह अन्य निवडणुकीत सोयीची भूमिका घेतली जायची.
आमदार सतेज पाटील व महाडिक यांच्यातील वादाला सुरुवात झाल्यानंतर संधी मिळेल तिथे या सत्तेच्या जोरावर महाडिक यांनी पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकीत अवघ्या पंधरा दिवसात अमल महाडिक यांनी सतेज पाटलांचा पराभव केल्यानंतर पाटील यांनी जिल्ह्यातील महाडिकांची सत्ता केंद्र काबीज करण्यास सुरुवात केली.
चार वर्षांपूर्वी झालेल्या ‘गोकुळ’च्या निवडणुकीतच सर्व महाडिक विरोधकांना एकत्र केले. त्यात त्यांच्यासोबत संघाचे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्यासह सहा संचालकांनी साथ दिली. त्या जोडीला मंत्री हसन मुश्रीफ, आमदार डॉ. विनय कोरे, प्रा. संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके आणि शेवटच्या क्षणी पालकमंत्री प्रकाश आबिटकर सोबत आले. दुसऱ्या बाजूला महाडिक, पी. एन. व नरके हे तिघेच नेते राहिले. ज्यांच्याकडे गठ्ठा मतदान अशा दिग्गज संचालकांनी सोडलेली साथ आणि अन्य नेत्यांनी दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर पाटील-मुश्रीफ यांनी ‘गोकुळ’ची सत्ता मिळवली.
गेल्या चार वर्षात गोकुळच्या राजकारणात काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ जे सांगतील तेच निर्णय या संचालक मंडळ आणि अध्यक्षांकडून घेतले जात होते. मात्र मध्यंतरीच्या काळात महायुतीचे सरकार अस्तित्वात आले. लोकसभा निवडणुकीत ज्या मंडलिक यांनी गोकुळच्या निवडणुकीत साथ दिली त्यांच्याच विरोधात सतेज पाटील मैदानात उतरले.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी ज्यांनी ‘गोकुळ’मध्ये ज्यांनी साथ दिली, अशा चंद्रदीप नरके, पालकमंत्री प्रकाश आबिटकर त्यांनाच शह देण्याचा प्रयत्न केला. त्यात पहिला धक्का माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांना बसला. लोकसभा निवडणुकीत मंडलिक यांचा पराभव झाला. त्यामुळे मंडलिक देखील पाटील यांच्यावर नाराज आहेत. शिवाय मंत्री मुश्रीफ यांच्या गटावर देखील मंडलिक नाराज आहेत.
विधानसभा निवडणुकीत पाटील यांनी पालकमंत्री आबिटकर, आमदार नरके, माजी आमदार राजेश पाटील, डॉ. सुजित मिणचेकर यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली. विधानसभेत आबिटकर, नरके यांचा विजय झाला. गोकुळमध्ये पाटील यांना साथ दिली पण विधानसभा निवडणुकीत आपल्या विरोधात प्रचार केल्याचा राग या तिन्ही माहितीच्या आमदारांमध्ये आहे. मंत्रीपदावर निवड होताच आबिटकर यांनी स्वागताची मिरवणूक सोडून थेट बावडा येथील राजाराम कारखाना गाठून माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेतली. त्याचवेळी आबिटकर यांनी एक प्रकारे इशारा दिला होता.
त्यामुळे आता महायुतीच्या आमदारांपुढे गोकुळ दूध संघावर महायुतीचाच अध्यक्ष असावा, अशी भूमिका आहे. त्यामुळे अरुण डोंगळे हे महायुतीचे असून त्यांनाच राजीनामा न देण्याची सूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिली आहे. या सर्व आमदारांची एक प्रकारे छुपी मदत डोंगळे यांना असल्याचे सांगितले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.