Gokul Zirwal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gokul Zirwal And NCP : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातली गोकुळ झिरवळांची 'एन्ट्री' फिक्स; गळ्यात तुतारीचा गमछा घालून...

Deepak Kulkarni

Nashik News : महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे चिरंजीव गोकुळ झिरवळ यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दिंडोरी मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याचे यापूर्वीच सांगितले होते. तसेच त्यांनी अजित पवार यांच्या दिंडोरीतील 'जनसन्मान यात्रे'कडेही पाठ फिरवली होती. त्यामुळे ते यात्रेला अनुपस्थित राहिल्याने गोकुळ झिरवळ यांची लढत त्यांचे वडील नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांच्यासोबत होणार असल्याचेही बोलले जात आहेत.

यातच आता गोकुळ झिरवळ यांनी गळ्यात तुतारीचा गमछा घालून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेत ते सहभागी झाले आहेत. त्यामुळे त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातली एन्ट्री फिक्स झाल्याचे बोलले जात आहे.

गोकुळ झिरवळ हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते,दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ यांचे पुत्र आहेत.ते मंगळवारी (ता.24) राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या मंचावर पाहायला मिळाले.तसेच गळ्यात तुतारीचा गमछा घालून गोकुळ झिरवळ हे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मंचावर उपस्थित होते.

अजित पवारांची साथ सोडून झिरवळ कुटुंबीय हे शरद पवारांच्या पक्षात दाखल होणार असल्याची चर्चा दिंडोरी विधानसभा मतदारसंघात जोर धरू लागल्याचे पाहायला मिळत आहे. या चर्चांना पूर्णविराम देत खुद्द नरहरी झिरवळ यांनी आपण अजित पवारांसोबतच राहणार असल्याचे ठणकावून सांगितले होते.

गोकुळ झिरवळ हे त्यांच्या एका वक्तव्याने चांगलेच चर्चेत आले होते.'माझी छाती फोडली तर त्यात शरद पवार दिसतील,'असं विधान करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात खळबळ उडवून दिली होती.त्यांनी तुतारी चिन्हावर विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत देतानाच आपण आजही शरद पवार यांच्यासोबत असल्याचं स्पष्ट केलं होतं.

त्यावर नरहरी झिरवळ यांनी गोकुळ झिरवळ हा माझा मुलगा आहे आणि मी त्याचा बाप आहे.त्याला आमदार करायचे असेल तर मी अजितदादांना सांगेन असं रोखठोक विधान केलं होतं. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सध्या दिंडोरी भागात सुरू आहे. त्यात गोकुळ झिरवळ सहभागी झाले.

गोकुळ झिरवळ नेमकं काय म्हणाले...?

गोकुळ झिरवळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,शिवस्वराज्य यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय माझा स्वत:चा आहे.

तसेच दिंडोरीमधून लढण्यासाठी आपण इच्छुक आहे.मात्र,याचवेळी त्यांनी पक्ष आणि महाविकास आघाडी ज्याला उमेदवारी देईल. त्याचा आम्ही प्रचार करू. त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू, अशी भूमिकाही स्पष्ट केली आहे.

जयंत पाटलांची बोलकी प्रतिक्रिया...

गोकुळ झिरवळ यांनी ‘शिवस्वराज्य यात्रे’साठी नाशिकमध्ये बॅनरबाजी केली आहे. ठिकठिकाणी स्वागताचे पोस्टर लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवरुन नाशिक, दिंडोरीत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनीही भाष्य केले. गोकुळ यांच्या पक्षप्रवेशाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही.त्यांनी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज दाखल केला आहे.मात्र पक्षाने अजून उमेदवारीबाबत निर्णय घेतलेला नाही अशी माहिती जयंत पाटलांनी यावेळी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT