अविनाश काळे
Marathwada Political News : इकडे मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मराठवाड्यातील जागावाटपावर चर्चा करण्यासाठी दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या विद्यमान आमदाराच्याविरोधात उमरगा-लोहारा मतदारसंघात भाजप इच्छुकाने दंड थोपटले आहेत. एवढेच नाही, पक्षाने उमेदवारी दिली नाही, तर अपक्ष लढण्याची तयारी दाखवत बंडाचे निशाणही फडकावले आहे.
महायुतीतील शिवसेना-भाजप या दोन पक्षामध्येच मतदारसंघात उमेदवारीवरून संघर्ष भडकण्याची शक्यता आहे. उमरगा-लोहारा या आरक्षित मतदारसंघाचे प्रतिनिधित्व विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले (Dharashiv) हे करत आहेत. महायुतीत विद्यमान आमदारालाच उमेदवारी देण्याचा फाॅर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. अशावेळी ज्ञानराज चौगुले यांच्या विरोधात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे यांनी दंड थोपटल्याने मतदारसंघातील वातावरण तापले आहे.
अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या उमरगा - लोहारा विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदा नकारात्मक भूमिकेत असलेले भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे यांनी सर्व जाती, धर्मातील लोकांच्या रेट्यामुळे आपण निवडणूकीच्या तयारीला लागलो असल्याचे आज पत्रकारांशी संवाद साधतांना सांगितले. प्रकृती अस्वस्थतेमुळे भाजपाकडे निवडणूक लढविण्याची तयारी आपण दाखविली नव्हती.
मात्र गेल्या दोन महिन्यापासून मतदार संघातील लोकांनी माझ्या प्रेमापोटी व आग्रहाने मला निवडणूक लढविण्यास विनंती केल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. (BJP) भाजपाने उमेदवारी टाळल्यास ऐनवेळी अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याची आपली तयारी असल्याचे स्पष्ट करत शिंदे यांनी खळबळ उडवून दिली आहे. हा मतदारसंघ पंधरा वर्षेपासून शिवसेनेकडे आहे. तीन टर्म इथे विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले निवडून आले आहेत.
कैलास शिंदे यांच्या दावेदारीमुळे आता या मतदारसंघात पेच निर्माण होणार आहे. भविष्यात काहीही घडू शकते, मात्र मी निवडणूक लढविणार अन् निवडूनही येणार, असा दावा शिंदे यांच्याकडून केला जात आहे. दरम्यान 2014 मध्ये युतीमध्ये फूट पडल्यानंतर कैलास शिंदे यांनी भाजपकडून निवडणूक लढविली होती.
तेव्हा त्यांना 33 हजार मते मिळाली होती. दरम्यान दलित मतांची विभागणी व्हावी, त्यातुन शिवसेनेचे आमदार चौगुले यांना निवडणूक सोपी होईल, या चर्चांना काही अर्थ नाही, या अफवा आहेत असे सांगत शिंदे यांनी मी निवडून येणार असल्यामुळे काही मंडळींकडून त्या पसरवल्या जात असल्याचा आरोप केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.