Eknath Shinde & Gopichand Padalkar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

गोपीचंद पडळकर अजित पवारांना नडले तसे एकनाथ शिंदेंना भिडणार का?

आमदार पडळकर यांनी भाजप प्रणीत सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाची स्थापना केली.

Sampat Devgire

नाशिक : एसटी कर्मचाऱ्यांच्या (MSRTC) संपात (Strike) पुढकार घेऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे आमदार गोपिचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आता एसटी कर्मचारऱ्यांची संघटना स्थापन केली आहे. समितीने मंजुर केलेल्या १६ मागण्यांची शासनाने कार्यवाही करावी अशी या संघटनेची भूमिका आहे. त्यासाठी आमदार पडळकर आता भाजपच्या (BJP) पाठींब्यावरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी भिडणार का? याची चर्चा आहे. (BJP MLA Gopichand Padalkar Recently form a ST Employees union)

राज्य परिवहन महामंडळाच्या बेमुदत संपात दोन विषयांची चर्चा होती. पहिली म्हणजे भाजप आमदार पडळकर व सदाभाऊ खोत यांची राज्य शासनावर गंभीर आरोपांचे शरसंधान आणि दुसरी एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारमध्ये सामाउन घेणे. या संपात सर्वपक्षीय समितीची विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत १६ मागण्या मान्य झाल्या होत्या. मात्र निधीच्या कमतरतेमुळे त्यांची अंमलबजावणी लांबणीवर टाकण्यात आली होती.

नेमक्या याच मागण्यांसाठी आता भाजप नेते तथा विधान परिषदेचे सदस्य गोपीचंद पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली व सतीश मेटकरी यांच्या प्रयत्नातून सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाची स्थापना करण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय, हक्क व हितासाठी ही संघटना राज्यभरात काम करीत आहेत. संघाचे केंद्रीय उपाध्यक्ष किरण पवार, सहसरचिटणीस अनुप खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली. त्यात या मागण्यांसाठी संघर्ष करण्याचे ठरले.

सध्या भाजपच्या पाठींब्यावर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार आहे. त्यामुळे या मागण्यांसाठी त्यांना फारसा संघर्ष न करताच मागण्या मान्य होऊ शकतात. तसे न घडल्यास पडळकर व श्री. खोत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पंगा घेणार का? याची उत्सुकता आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या व प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यासाठी जिल्हाभरात दौरा करणार असून, प्रत्येक कर्मचाऱ्याची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे प्रश्न समजून घेणार आहे. तसेच, राज्य शासनाकडे पाठपुरावा करून त्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावले जातील, अशी माहिती देण्यात आली.

या बैठकीत नाशिक विभाग व जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात विभागीय अध्यक्षपदी भाजपाचे माजी नगरसेवक हेमंत शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी शेट्टी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, नाशिक जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविणे, त्यांना विमा संरक्षण मिळवून देणे, सर्वांना संघटित करणे, सामाजिक बांधिलकीद्वारे एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे हित जोपासणे, त्यांच्या सुख दुःखात सहभागी होणे आणि एसटी कर्मचाऱ्यांचे जाळे विणण्यासाठी नाशिक जिल्हाभरात दौरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नाशिकची विभागीय कार्यकारिणी...

अध्यक्ष - हेमंत शेट्टी (पंचवटी), उपाध्यक्ष- विलास बिन्नर (इगतपूरी), सुनील शिंदे (पंचवटी), शशिकांत धेपले (नाशिक), महादेव वाघमारे (पिंपळगाव) , सचिव - बाळकृष्ण आव्हाड (सिन्नर), सहसचिव - मन्साराम चव्हाण (कळवण), राकेश सांगळे (इगतपुरी), चिंतामण सानप (पंचवटी), नाशिक राजेश वाबळीकर (नाशिक), कार्याध्यक्ष- राजेंद्र पाठक.

....

राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या सोळा मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र त्याबाबत अद्याप कार्यवाही झालेली नाही. त्यांच्या पुर्ततेसाठी आम्ही आमदार पडळकर यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाशी संघर्ष करणार आहोत.

- सतिश मेटकरी, सरचिटणीस, सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कर्मचारी संघ.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT