Arangaon Village Sarpanch  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gram Panchayat Election Results: सरपंच होण्यासाठी 32 वर्षे लढा; अखेर 51 व्या वर्षी पोपट पुंड झाले सरपंच

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News: जनसेवेची आवड, गावचा विकास हे स्वप्न घेऊन 19-20 वर्षांच्या एका तरुणाने सरपंच पदाचे स्वप्न पाहिले. पंचवार्षिकला कधी ग्रामपंचायत, तर कधी पंचायत समिती निवडणुका लढवल्या, पण तब्बल 32 वर्षे पदरी अपयश पडले. गावात ज्यांच्या हातात सत्ता होती ते प्रस्थापित होते. मात्र, गड्याने सरपंच होण्याचा हट्ट आणि धीर सोडला नाही, अखेर वयाच्या 51 वर्षांत असताना यंदा विजयाचे झुकते माप नियतीने त्यांच्या पारड्यात टाकलेच आणि गावचे लोकनियुक्त सरपंच होण्याचा मान मिळाला आणि 32 वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले.

ही गोष्ट आहे नगर तालुक्यातील अरणगावचे नूतन सरपंच पोपट पुंड यांची. आज निवडणुकीचे सरपंचपदाचे आणि सदस्यांचे निकाल येताच पोपट पुंड यांच्या अरणगाव ग्रामविकास पॅनेलच्या तहसील केंद्राबाहेर उपस्थित असलेल्या समर्थक कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. जोरदार घोषणाबाजी झाली, गुलालाची मुक्त उधळण झाली आणि या जल्लोषमयी वातावरणात कार्यकर्त्यांनी पुंड यांना खांद्यावर नाचवत आनंद साजरा केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नगरपासून अवघ्या पाच-सात किलोमीटरवर अरणगाव आहे. इथल्या ग्रामपंचायतीत माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या समर्थकांची सत्ता गेली अनेक वर्षे होती. या प्रस्थापित सत्तेला शह देण्याचे काम पोपट पुंड गेली अनेक वर्षे करत होते. त्यांनी वयाच्या 19-20 व्या वर्षी गावचे सरपंच व्हायचे म्हणून स्वप्न पाहिले. मधल्या काळात त्यांनी 2002 ला पंचायत समिती, तर 2014 ला सरपंच होण्यासाठी निवडणूक लढवली, पण त्यांना काही न काही मतांनी पराभवाला सामोरे जावे लागत होते.

सातत्याने पराभव पाहावा लागत असला तरी त्यांनी जिद्द सोडली नव्हती. गावामधील लोकसेवेची कामे त्यांची सुरू होती. जनसंपर्क चांगला होता. सत्तेत नसले तरी गावच्या विकासासाठीच्या शासनाच्या योजना गावात कशा येतील, यासाठी त्यांचे प्रयत्न आणि पाठपुरावा सुरू होता. अखेर यंदा पुन्हा ग्रामपंचायत निवडणूक लागली आणि पुंड यांनी अरणगाव ग्रामविकास पॅनेल पाचपैकी चार प्रभागात उभा करत स्वतः सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

पुंड यांना गावातील मतदारांनी आणि त्याच बरोबर नशिबाने अशी साथ दिली, की त्यांच्या चारही प्रभागांतील 12 उमेदवार निवडून आले. त्यावर विशेष म्हणजे स्वतः पुंड हे पण सरपंचपदाच्या अटीतटीच्या निवडणुकीत 989 मतांनी निवडून आले. पुंड यांचे नशीब असे की, पाचव्या प्रभातील निवडून आलेल्या दुसऱ्या एका पॅनेलच्या तीनही उमेदवारांनी पुंड यांना साथ देणार असल्याचे सांगितल्याची माहिती स्वतः पुंड यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली. म्हणजे थोडक्यात आता विरोधकांचा सूपडासाफ करत पुंड यांची संपूर्ण सत्ता अरणगाव ग्रामपंचायतीवर असणार आहे.

नूतन सरपंच पोपट पुंड आणि त्यांचे संपूर्ण अरणगाव ग्रामविकास पॅनेलला आमदार नीलेश लंके यांचा पाठिंबा होता, तर विरोधात नगर तालुक्यातील दिग्गज नेते माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या समर्थकांचा पॅनेल होता. एकंदरीत अरणगावच्या निवडणुकीकडे संवेदनशील आणि लक्षवेधीपणे पाहिले जात होते.

अशात पोपट पुंड यांनी विरोधकांवर निर्विवाद मात करत एकहाती सत्ता आणली. मात्र, हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्यांना तब्बल 32 वर्षांची प्रतीक्षा करावी लागली हे विशेष. आता निवडून आल्यानंतर केवळ आणि केवळ अरणगावचा विकास हेच स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले. मुळा डॅममधील पाणी योजना पूर्ण करून अरणगावला येत्या 4 महिन्यांत पाणी देऊ, असे त्यांनी या वेळी सांगितले.

Edited By - Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT