Gram Panchayat Election  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Politics: प्रशासनाचा भोंगळ कारभार; सरपंचपदासाठी अर्ज नेला, पण अधिकाऱ्यांनी दाखवले मयत

Ganesh Thombare

Ahmednagar News: मोठ्या उत्साहात ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा अर्ज भरण्यासाठी गेल्यावर तिथे मतदार यादीत मयत म्हणून दाखवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगावातील अंकुश फकिरा बर्डे यांच्याबाबत हा प्रकार घडला आहे. हा प्रकार समोर येताच प्रशासनाची दुरुस्तीसाठी धावपळ उडाली. तहसीलदार मिलिंद वाघ यांनी याची दखल घेत संबंधित तलाठी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी शनिवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगावतील अंकुश बर्डे हे सरपंचपदासाठी अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयात गेले होते. अर्ज भरताना त्यांची पडताळणी करताना त्यांना मतदार यादीत मयत घोषित करण्यात आले होते.

अंकुश बर्डे यांच्या नावासमोर मतदार यादीत क्रमांक 493 समोर 'डिलीट', असे लिहिण्यात आले होते. अंकुश बर्डे यांनी यावर जिवंत असल्याचे सर्व कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्यांसमोर ठेवली. छायाचित्र ओळखपत्रांसह इतर नातेवाइकांना हजर केले. यामुळे प्रशासनाची भंबेरी उडाली. हे प्रकरण तहसीलदारापर्यंत गेले.

तहसीलदार मिलिंद वाघ यांनी याची पडताळणी केल्यानंतर कामगार तलाठी यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार झाल्याचे समोर आले. तहसीलदार मिलिंद वाघ यांनी संबंधित कामगार तलाठी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

दरम्यान, अंकुश बर्डे यांचा सरपंचपदासाठीचा अर्ज ग्राह्य धरण्यात आला. मतदार यादीच्या या घोळाची माहिती आमदार लहू कानडे यांनादेखील समजली. त्यांनी लगेचच तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून माहिती घेत कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.

नेमका प्रकार काय ?

श्रीरामपूर तालुक्यातत 17 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. यासाठी विधानसभा 2021 ची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी याच मतदार यादीचा आधार घेत प्रभागनिहाय यादी बनवण्यात आली.

कामगार तलाठ्यांनी ही यादी अपडेट केली. संगणकावर 755 क्रमांकाचा मतदार वगळण्यास सांगण्यात आले होते. परंतु नजरचुकीने 555 क्रमांक वगळून 'डिलीट', असे लिहिले गेले. आता यादीत दुरुस्ती करत नाव समाविष्ट करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

Edited by Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT