Jalgaon News : मुक्ताईनगर तालुक्यातील गौणखनिज उत्खनन प्रकरणी १३७ कोटींच्या दंडाची नोटीस आल्यानंतर माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी या संबंधी चौकशीत 'एसआयटी'च्या अहवालात खडसे परिवारातील कुणाचेच नाव नव्हते. मात्र, राजकीय दबावामुळे अगदी ऐनवेळी आमची नावे टाकण्यात आल्याचा आरोप केला.
अशा प्रकारच्या गौणखनिज उत्खननाच्या प्रक्रियेत ज्या खात्याला ते हवे आहे व ज्या मक्तेदाराने त्याचा उपसा केला आहे, त्याला नोटीस बजावता येते. मात्र, अशी प्रक्रिया न राबविता, आमचे कोणतेही म्हणणे न ऐकता 'एसआयटी'ने एकतर्फी नोटीस बजावल्याचा दावाही खडसेंनी केला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी मुरूम उत्खननासाठी संबंधित रस्ते कामाच्या मक्तेदारास कंत्राट देण्यात आले होते.
कामाला लागणाऱ्या मुरमापेक्षा अतिरिक्त मुरूम व गौणखनिज उत्खनन झाल्याचा दावा करत महसूल विभागाने एकूण रकमेच्या पाचपटीने १३७ कोटींच्या दंडाची नोटीस एकनाथ खडसेंसह, खासदार रक्षा खडसे, मंदाकिनी खडसे, रोहिणी खडसेंना बजावली आहे. या प्रकरणावर मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी खडसेंनी त्यात चोरी केली नाही, असे सिद्ध करावे, असे आव्हान दिले होते.
आमचा काय संबंध?
त्यासंदर्भात खडसे म्हणाले, हे सर्व प्रकार राजकीय द्वेषाने सुरू आहेत. गौणखनिज उत्खननाशी आमचा कोणताही संबंध नाही. राष्ट्रीय महामार्गाला गौणखनिज हवे होते, त्यांनी निविदा काढली, मक्तेदाराने ते पुरविले. ते किती पुरवले, कसे पुरवले, याचा हिशोब मक्तेदाराने व वेळच पडली तर महामार्ग प्राधिकरणाने द्यायचा आहे.
त्याबाबत शेतजमिनीचे मालक म्हणून आम्हाला नोटीस देण्याचे काय कारण ? या प्रकरणात जी 'एसआयटी' नेमली, त्या समितीने आमचे म्हणणे न ऐकता एकतर्फी निर्णय दिला. चौकशीत आमचे कुठेही नाव नव्हते. मात्र, खडसे नावाची ॲलर्जी असलेल्यांनी राजकीय दबाव वापरून ऐनवेळी आमची नावे टाकण्यात आली, असा आरोपही त्यांनी केला. असे असले तरी आपण चौकशीला घाबरात नाही, या विरोधात उच्च न्यायालयात (High Court) दाद मागू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.