Ajit Pawar Uddhav Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Politics : अजितदादांच्या पठ्ठ्याने फासे टाकले, धक्का उद्धव ठाकरेंना बसणार ; जळगाव बाजार समितीत बंडाचा स्फोट !

Jalgaon Bazar Samiti : जळगाव बाजार समितीत सत्ता पालटांचे संकेत मिळाले आहेत. महायुतीच्या हातात बाजार समितीची सत्ता जाणार असून महायुतीचा सभापती होण्याची चिन्हे आहेत.

Ganesh Sonawane

Maharashtra politics : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधीच जळगावात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदावरुन राजकारण तापलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान सभापती श्यामकांत सोनवणे यांच्या विरोधात १३ संचालकांनी अविश्वास ठराव आणला आहे. महायुतीचे हे तेरा ही संचालक सहलीवर रवाना झाले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार यांचा गट व भाजप मिळून महायुतीचा सभापती करण्याच्या हालचाली सुरु आहेत. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) गटात प्रवेश केला. आता त्यांनीच बाजार समितीत सत्तांतराचे फासे टाकले आहेत. आगामी सभापती व उपसभापती निवडीचे ते किंगमेकर असतील असे चित्र आहे. बाजार समितीत २०२३ मध्ये त्यांनीच सत्ता खेचून आणली होती. महाविकास आघाडीने देवकर यांच्या नेतृत्वात १८ पैकी ११ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी सभापती पदावरुन जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे श्यामकांत सोनवणे सभापती व पांडुरंग पाटील यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली होती.

त्यावेळी सोनवणे व पाटील या दोघांनाही एक-एक वर्ष पदावर राहावे व नंतर राजीनामा देऊन दुसऱ्या संचालकांना संधी दिली जाईल असे ठरले होते. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच उपसभापती पांडुरंग पाटील यांनी आपल्यापदाचा राजीनामा दिला आहे. परंतु सोनवणे यांनी अद्यापही ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिलेला नाही. ते राजीनामा द्यायला तयार नाहीत. त्यामुळे आता सभापती सोनवणे यांच्यावर १३ संचालकांनी अविश्वास ठरावाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं आहे. त्यामुळे बाजारसमितीमधील राजकीय वातावरण चांगलच गढूळ झालं असून सत्तापालटाचे संकेत आहेत.

गुलाबराव देवकर पूर्वी महाविकास आघाडीचा घटक होते. परंतु ते राष्ट्रवादी (अजित पवार ) यांच्यासोबत आल्याने गणिते बदलली आहेत. देवकर यांच्यासोबत काही संचालकही तिकडे गेले आहेत. मनोज चौधरी यांनीही नुकताच काही दिवसांपूर्वी भाजपत प्रवेश केला. सुनील महाजन यांच्याही भाजप प्रवेशाच्या चर्चा आहेत त्यामुळे बाजार समितीत महायुतीची सत्ता येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, उपसभापती पांडुरंग पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी येत्या मंगळवारी (दि. १२ ) निवडणूक होणार आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासोबत सर्वांधिक संचालक असल्याने ते किंगमेकर ठरणार आहेत. कुणाला उपसभापती करायचं हे त्यांच्याच हातात आहे. तर सभापती निवडीसंदर्भात जिल्ह्याधिकाऱ्यांकडे निर्णयाचा चेंडू आहे. त्यामुळे ते सभापती निवड केव्हा ठरवितात? याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

कोणत्या संचालकांनी बंड केलं आहे?

महायुतीचे १३ संचालक दिलीप कोळी, सुनील महाजन, मनोज चौधरी, लक्ष्मण पाटील, संदीप पाटील, जयराज चव्हाण, योगराज सपकाळे, अरुण पाटील, पांडुरंग पाटील, हेमलता नारखेडे, पल्लवी देशमुख, समाधान धनगर, प्रभाकर सोनवणे या संचालकांनी बंड केलं असून ते सहलीला गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT