Drought Politics News : राज्यात तीव्र दुष्काळाची स्थिती आहे. यामध्ये टंचाई दूर करण्यासाठी जलसंधारणाची कामे प्राधान्याने करावी लागणार आहेत. मात्र त्यात वेगळीच समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जलसंधारणाची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात त्यांनी प्रशासनाची बैठक घेतली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत.
छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुणे विभागातील संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथिगृह येथे मुंबईत बुधवारी बैठक झाली. या बैठकीत राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि अपर मुख्य सचिव पराग जैन नैनोटिया यांसह विविध जिल्हाधिकारी आणि विभागीय महसूल आयुक्त उपस्थित होते. गुलाबराव पाटील यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत प्रशासनाला धारेवर धरले.
संधारणाची कामे तातडीने पूर्ण झालीच पाहिजे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे सर्व जिल्ह्यांचे टंचाई आराखडे 15 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्यक्षात मात्र राज्यभरातील कंत्राटदारांचे हजारो कोटी रुपये शासनाने थकवले आहेत. गेली पाच वर्षे कंत्राटदारांनी या मागणीसाठी वारंवार आंदोलन केले. मुंबई उच्च न्यायालयात दावा देखील दाखल केला होता.
कंत्राटदारांनी प्रयत्न करूनही त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही. कंत्राटदारांनी कामे पूर्ण केल्यास त्यांना दहा ते पंधरा टक्के निधी दिला जातो. उर्वरित निधी कधी उपलब्ध होईल, यावर कंत्राटदार अक्षरशः डोळे लावून बसतात. त्यानंतर खिशाला वेगळी तोशीश देऊन विविध मार्गाने पैसे मिळविण्याचे खटाटोप सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कंत्राटदारांना पैसेच मिळाले नसल्याने अनेक कामे अर्धवट स्थितीत असल्याचे प्रशासकीय अहवाल शासनाला उपलब्ध झाले आहेत. दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर विविध मंत्री दुष्काळी कामांच्या घोषणा करीत आहेत. या घोषणांमुळे नवी समस्या उद्भवण्याची चिन्हे आहेत. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी यासंदर्भात तातडीने कामे पूर्ण करण्याची घोषणा केली आहे.
यापूर्वी जळगाव येथे झालेल्या बैठकीत देखील त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. मात्र पैशांचे सोंग करता येत नसल्याने दुष्काळाच्या संकटात मंत्री आपल्याच घोषणांमध्ये अडकण्याची चिन्हे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.