Dada Bhuse &Gulabrao Patil
Dada Bhuse &Gulabrao Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

गुलाबराव पाटील म्हणाले, अन्यथा मंत्रालय हलवून टाकेल!

Sampat Devgire

जळगाव : जिल्ह्यातील कृषी (Agriculture) विभागातील रिक्त जागा भरण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) शुक्रवारी चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. रिक्त जागा भरण्यासाठी त्यांनी चक्क आपल्याच पक्षाच्या मंत्र्याकडे (Colleague Minister) असलेल्या कृषी खात्याला अल्टिमेटम दिला आहे. मे अखेरपर्यंत जिल्ह्यामधील कृषी विभागातील जागा न भरल्यास ‘मंत्रालय हलवून टाकेल’, (Will stir Mantralay) अशा शब्दात ते व्यक्त झाल्याचे पाहायला मिळाले.

आपल्या सडेतोड वक्तव्यांसाठी परिचीत असलेले जलसंपदा मंत्री व शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या कामाचा झपाटाही तसाच आहे. जळगाव जिल्ह्यातील कृषी विभागाच्या गोंधळ व कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येबाबत ते अॅक्टीव्ह झाले आहेत. त्यात त्यांनी थेट आपल्या पक्षाच्याच कृषी मंत्री दादा भुसे यांना अल्टीमेटम देऊन टाकले. त्यामुळे तो चर्चेचा विषय आहे.

कृषी विभागातील रिक्त पदांबाबत नुकतेच वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत पालकमंत्री पाटील यांनी मंत्रालयात रिक्त पदे भरण्याबाबतची माहिती घेतली. जळगाव जिल्ह्यातील कृषी विभागातील रिक्त पदे येत्या ३१ मे अखेर भरली जातील, असे आश्‍वासन राज्याचे कृषी सचिव, कृषी मंत्र्यांनी दिले असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी दिली.

पालकमंत्र्यांनी सांगितले, की अर्धा जळगाव जिल्हा केळी व कापूस पिकविणारा आहे. जर सैनिक नसतील तर लढाई कशी लढणार? खरीप हंगाम तोंडावर आहे. शेतकऱ्यांवर विविध प्रकारची नैसर्गिक संकटे येतात. पिकाचे नुकसान होते. अनेक योजना राबवायच्या असतात. त्यात कृषी विभागात कर्मचारी नसतील तर कृषीचे काम कसे चालेल ? नाशिक विभागात कृषी विभागाची ९८ टक्के पदे भरली आहे. इतर जिल्ह्यातही कृषी विभागात पदे भरलेली आहे. मग केवळ जळगाव जिल्ह्यावरच अन्याय का?.

ते म्हणाले, दोन वर्षापासून कमी कर्मचारी संख्येवर कृषी विभाग सुरू आहे. रिक्तपदे भरा नाहीतर मंत्रालय हलवून टाकीन, असे सांगितल्याने मे महिन्याच्या अखेरीस ज्या बदल्या होतात त्यात जळगाव कृषी विभागाची रिक्त पदे भरण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT