Lord Ganesha
Lord Ganesha Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ganesh Festival: धार्मिक उत्सवांमधून व्हावी आनंदाची पेरणी

Sampat Devgire

डॉ. राहुल रनाळकर

नाशिक : आनंदी वृत्तीला तसं काही निमित्त लागत नाही, आनंदी राहणं ही मनाची अवस्था मानली गेली आहे. मात्र, या आनंदी मनोवृत्तीला खतपाणी घालण्याचं, वृद्धिंगत करण्याचं काम आपल्या सण-उत्सवांमधून (Festivals beano) सातत्यानं होत आलं आहे. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव (Ganesh Festival) आला आहे. घरोघरी गणरायाच्या स्वागताची लगबग दिसून येत आहे. (People shall spread happyness in Ganesh festival celebration)

बुद्धीची, विद्येची देवता गणपतीचं पूजन आपण करतो. गणरायाच्या आगमनापासून पुढे पितृपक्ष, नवरात्र ते दसरा-दिवाळीपर्यंतचा हा काळ संपूर्ण समाजासाठी आनंददायी ठरणारा असतो. या काळात आनंदाची पेरणी करण्यासाठी समाजातील सज्जन शक्तींनी पुढे येण्याची ही वेळ आहे.

सज्जन शक्तींचा पुढाकार आणि सहभाग महत्त्वाचा असल्याचं कारण म्हणजे सध्याच्या सण-उत्सवांचं स्वरूप बाजारीकरणाकडे झुकणारं दिसून येतं. गणेशोत्सवात ही बाब प्रकर्षानं समोर येते. भारतीय शास्त्र, पुराणांमध्ये नमूद असलेली श्रीगणेशाची उपासना, आराधना आणि सध्याचं गणेशोत्सवाचं स्वरूप हे अत्यंत भिन्न आणि विकृतीकरणाकडे झुकताना दिसतं. अगदी पीओपीच्या मूर्तींपासून ते डीजेच्या अनावश्यक आणि कर्कश वापरापर्यंत अनेक नकारात्मक आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या गोष्टींचा उदो उदो सध्या कमालीचा वाढला आहे. त्यात गणेशोत्सवाच्या मूळ संकल्पनेलाच तडा पडत असल्याचे दिसून येते. ज्या संकल्पना शेकडो-हजारो वर्षांपासून आपल्या समाजाने जपून ठेवल्या आहेत, त्याचं सध्या होत असलेलं विकृतीकरण मन सुन्न करणारं आहे. हे रोखण्यासाठी पुढाकार घेण्याचं काम सज्जन शक्तीला करावं लागणार आहे.

गणेश मंडळांच्या माध्यमातून सुरू होणारं राजकारण, वर्गणीच्या नावाखाली वसूल केली जाणारी खंडणी, कार्यकर्त्यांच्या आडून पोसली जाणारी गुन्हेगारी या घातक बाबीदेखील काही वर्षांत फोफावल्या आहेत. या गोष्टींना खतपाणी घालणारी मंडळी कुठली आहेत, हे आता सुज्ञ लोकांपासून फारस लपून राहिलेलं नाही. गणेशोत्सवापाठोपाठ येणारा पितृपक्ष, नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी हे खरंतर आपल्या संस्कृतीची देण लाभलेला कालखंड आहे. पूर्वजांचं स्मरण करण्याचा, त्यांच्या गुणांना अभिवादन करण्याचा कालखंड जगात केवळ आपल्याकडेच पाळला जातो. या सगळ्या कालखंडात घराघरांमध्ये सकारात्मक आध्यात्मिक ऊर्जेचा संचार असतो. ही ऊर्जा आपल्याला सतत बळ देत असते. विकृतीकडे झुकणाऱ्या सणांच्या बाजारू मनोवृत्तीला वेसण त्यासाठीच घालावं लागणार आहे. ही जबाबदारी आता सज्जन मंडळींनाच उचलावी लागणार आहे.

सनातन परंपरा असलेला आपला भारत देश उत्सवप्रिय देश म्हणून जगात मान्यता पावला आहे. भारतीय संस्कृतीतील सण-उत्सवांच्या परंपरा या खरंतर आनंदाची पेरणी करणाऱ्या आहेत. आपली संस्कृती, परंपरा, शास्त्र आणि नीतीमूल्यांची कास पाश्चात्य देश धरू पाहत आहेत. भारतीय शास्त्रांमधील उपयुक्तता जगानं मान्य केली आहे. अगदी उदाहरण द्यायचं झालं, तर योग, प्राणायाम, ध्यानधारणा यांचं देता येईल. मनोविज्ञानाच्या क्षेत्रात भारतीय ऋषीमुनींनी खूप खोलवर विचार करून ठेवला आहे. योग सूत्रांमध्ये याचा प्रत्यय पदोपदी येतो. आता ही भारतीय मूल्यं स्वीकारण्यात आणि त्यावर आगेकूच करण्यात आपण मागे राहू नये, ही समाज म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT