मालेगाव : राज्याचे तात्पुरते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Kenath Shinde) जन्माष्टमीला म्हणाले, की आम्ही पन्नास थरांची हंडी फोडली. फोडली ना तुम्ही हंडी, पण पन्नास थर नव्हे, पन्नास खोकी लावून हंडी फोडली अन् मलई एकट्यानेच खाल्ली असे युवासेनेचे (Yuvasena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackrey) यांनी बंडखोर मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या मतदारसंघात सांगितले. (Eknath shinde taken all advantsges for himself only)
मालेगाव शहरात पावणेदहाच्या सुमारास आदित्य ठाकरे यांचे आगमन झाले. बोलण्यासाठी अवघे १५ मिनिटे असल्याने त्यांनी हार-तुरे सत्कार न स्वीकारता थेट माइक ताब्यात घेत मला बोलू द्या, असे सांगितले. यावेळी ते म्हणाले, येथील नेत्याला (दादा भुसे) आपण प्रेम दिले. डोक्यावर बसविले. कृषिमंत्री केले. आता यांचे खातेही आठवत नाही. ज्यांना मिठी मारली त्यांनी पाठीवर वार केले. त्यांच्या प्रचारार्थ येथे आलो होतो. रोड शो केला होता. त्यांच्यासह सर्व चाळीस जणांना गद्दारीचा शिक्का घेऊन फिरावे लागणार आहे. या भूमीत निष्ठेचा जन्म होतो. गद्दाराचा नाही. त्यामुळे राज्यातील जनता ही गद्दारी खपवून घेणार नाही.
श्री. ठाकरे म्हणाले, की राज्यात सध्या काय चाललंय, एक सीएम झाले. एक सुपर सीएम आहे. मुख्यमंत्री नेमके कोण, हेच समजत नाही. अनैतिक मार्गाने हे सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळेच मध्यावधी निवडणुका लागणार. म्हणूनच मी तात्पुरता सीएम असा उल्लेख केला. मी राज्यात सर्वत्र फिरत आहे. तुमच्याशी संवाद साधायला आलो. सर्वत्र प्रेम मिळते. हेच तुमचे प्रेम बघायला व आशीर्वाद घ्यायला मी आलो आहे. काही आपल्यात होते. गद्दार झाल्यानंतर त्यांचे काय झाले, तुम्ही बघितले.
येथील दत्त मंदिर चौकात झालेल्या सभेला आमदार नरेंद्र दराडे, जिल्हा नेते जयंत दिंडे, अल्ताफ खान, श्रीराम मिस्तरी, प्रमोद शुक्ला, महानगरप्रमुख राजाराम जाधव, कैलास तिसगे, हाजी मोहम्मद यासीन, भरत पाटील, प्रेम माळी, अजय जगताप, दत्तू गवळी, विलास बिरारी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यातील राजकारण घाणेरडे
राज्यात अतिशय घाणेरडे राजकारण सुरू आहे. गद्दारांना थोडीही लाज असेल, तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा. निवडणुका लढवाव्यात. जनतेचा कौल आम्ही मान्य करू. चाळीस गद्दार शिवसेनाप्रमुखांचे नाही झाले ते राज्याचे व तुमचे काय होणार. राज्यात शिवसेना तोडण्यासाठी सर्व सरसावले आहेत. ठाकरे परिवाराला संपविण्याचा डाव आहे. तुमच्या प्रेमाच्या जोरावर तो हाणून पाडू. वेळ कमी आहे. मी मालेगावला पुन्हा येईल, तुमच्याशी संवाद साधेल, असेही ते म्हणाले.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.