Hasan Mushrif News : अदृश शक्तीकडून होत असलेल्या संस्थांच्या तक्रारीवर न्यायालयाने लढाईत संघर्ष केलेल्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
सर्वोच्च न्यायालय, सर्किट बेंचमध्ये संस्थांना आम्ही पाठबळ दिले, आमच्या खांद्यावर बसून आमदार सतेज पाटील तिथे गेले. संस्थांनी सहा महिने जो संघर्ष केला, न्यायालयीन लढा दिला, त्यात त्यांचे एक टक्काही योगदान नाही. संस्थांची सहानुभूती मिळवण्यासाठी आता ते त्यांना पाठबळ देण्याचे सांगत आहेत, असा टोला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला.
ते म्हणाले, ‘गोकुळच्या संस्थांवर काही अदृश्य शक्तींनी विनाकारण आक्षेप घेतला. मात्र, आम्ही संस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो. सर्किट बेंच असेल किंवा सर्वोच्च न्यायालय, आम्ही संस्थांना सर्वप्रकारची मदत केली. हे संस्थांच्या प्रमुखांनाही माहिती आहे. मात्र, आता निवडणुकीत संस्थांची सहानुभूती मिळवण्यासाठी आमदार पाटील सर्वोच्च न्यायालयात मदत करण्याचे सांगतात. त्यांनी सहानुभूती मिळवण्याचा प्रकार करू नये.’
‘गोकुळचे दूध संकलन वाढावे, यासाठी संस्था वाढवल्या. त्यामुळे संकलन नऊ लाख लिटरवरून २० लाख लिटरवर गेले, वाढीव संस्थांनीच दूध वाढवले. या संस्थेतील काही मोजक्या संस्था सोडल्या, तर उर्वरित सर्व संस्था या राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्य पक्षांच्या आमदार, कार्यकर्त्यांच्याच होत्या. म्हणजे महायुतीच्याच होत्या. मग, त्यांना मतदार यादीत न घेण्यासाठी खटाटोप का केला?', असा सवाल त्यांनी केला.
'उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेगळे झाल्यानंतर ते पुढे मुख्यमंत्री झाले. सहकारमंत्री अतुल सावे होते. ३०८ दिवस अशी परिस्थिती राज्यात होती. त्यावेळी अदृश्य शक्तीने आपल्या संस्था का वाढवल्या नाहीत? शिवसेना, जनसुराज्य, राष्ट्रवादी एकत्र ‘गोकुळ’साठी मतदान करणारे पाच हजार ३८० सभासद आहेत. त्यातील काँग्रेसचे सोडले तर सुमारे साडेतीन हजार सभासद राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्य पक्षाचे आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पॅनेल बनवणार आहोत. कोणाला किती जागा, हे बैठकीनंतर ठरेल.', असेही मुश्रीफ यांनी सांगितले.
विकृत, अडाणी, अशिक्षित, विनाशकारी प्रवृत्तींचा सल्ला घेतल्यांनतर धूळदाण होतेच. अशा अर्धवट ज्ञान असणाऱ्यांचे ऐकून अदृश्य शक्तीने संस्थांना न्यायालयात खेचले. मी सुरुवातीपासूनच संस्थांच्या पाठीशी होतो. या संस्था आमच्या आहेत, आम्ही त्यांना सोडणार नाही, अशीच भूमिका होती. अर्धवट ज्ञान असलेल्या माणसाचे मार्गदर्शन घेतल्यानंतर एखाद्या मोहिमेचा कसा चुथडा होतो, त्याची प्रचिती या अदृश्य शक्तीला व जिल्ह्यालाही आली आहे, असा खोचक टोलाही प्रकाश बेलवाडे यांचे नाव न घेता मंत्री मुश्रीफ यांनी लगावला.