Food and Drug Administration Maharashtra : तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अहिल्यानगर कार्यालयातील पथकाने शिर्डीत पुन्हा एकदा मोठी कारवाई करत तब्बल 700 किलोहून अधिक पेढ्यांचा साठा जप्त केला.
या धडक कारवाईमुळे संपूर्ण शिर्डीत बुधवारी दिवसभर एकच चर्चा रंगली होती, “तुकाराम मुंढे पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आले!”
याआधी महिन्याच्या सुरुवातीलाच शिर्डी (Shirdi) येथील प्रसिद्ध ‘चिरंजीव पेढा’ प्रकरण राज्यभर गाजले होते. प्राथमिक तपासणीत या पेढ्यांवर बुरशी आढळल्याचा धक्कादायक खुलासा झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली होती. आता त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा विभागाचे पथक शिर्डीत दाखल झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये चांगलीच घबराट पसरली.
अन्न व औषध प्रशासनाच्या अहिल्यानगर कार्यालयातील पथकाची वाहने कारवाईसाठी शिर्डीत फिरत असताना, स्थानिकांमध्ये “तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) स्वतः शिर्डीत आले आहेत” अशा चर्चांना जोर आला. परिस्थिती अशी होती की, अनेक पेढा विक्रेत्यांनी कारवाईच्या भीतीने दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
भेसळ प्रतिबंधक पथकाने देवस्थान परिसरातील सुमारे 8 ते 10 पेढा विक्रेत्यांवर अचानक छापेमारी केली. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर पेढ्यांसह काही पॅकबंद खाद्य उत्पादनेही ताब्यात घेण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार सुमारे 700 किलो पेढे जप्त करण्यात आले आहेत.
अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, सध्या केवळ पेढे ताब्यात घेण्यात आले आहेत. जप्त केलेले नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार असून, त्यानंतरच पेढ्यांमध्ये भेसळ, निकृष्ट दर्जा किंवा अन्य नियमभंग आढळल्यास संबंधित व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे. प्राथमिक चौकशीत काही विक्रेत्यांकडून अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.
साईसमाधी दर्शनासाठी शिर्डीत लाखो भाविक येतात. यातून शिर्डीतील पेढा व्यवसाय हा मोठा उद्योग मानला जातो. मात्र सलग दोन कारवायांमुळे आता शिर्डीच्या प्रसिद्ध पेढा व्यवसायाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या सर्वांचे लक्ष प्रयोगशाळेच्या अहवालाकडे लागले असून, त्यानंतर या प्रकरणात आणखी मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय बनले असून, तुकाराम मुंढे यांच्या आक्रमक कारवाई शैलीची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.