Jalgaon municiple corporation
Jalgaon municiple corporation Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

घराबाहेर पडल्यास भाजपच्या नगरसेविका बेंडाळेंना नातेवाईकांचे प्रताप दिसतील?

Sampat Devgire

जळगाव : भाजप (BJP) नगरसेविका उज्वला बेंडाळे यांनी प्रभाग १२ (Jalgaon) मधील कामांची पाहणी करावी, त्यांच्याच नातेवाइकांनी केलेल्या कामाचे गैरव्यवहार उघड होतील, अशी टीका शिवसेना (Shivsena) नगरसेवक बंटी उर्फ अनंत जोशी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

भाजप नगरसेविका उज्वला बेडाळे व शिवसेना नगरसेवक बंटी जोशी यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. शिवसेना नगरसेवक बंटी जोशी यांनी पत्रकार परिषदेत नगरसेविका बेंडाळे यांच्या प्रश्‍नांना उत्तरे दिली, यावेळी बोलताना ते म्हणाले, की नगरसेविका बेंडाळे यांनी आपल्या प्रभाग क्रमांक बारामध्ये पाहणी करून निकृष्ट बांधकामाची तक्रार करण्याची घोषणा केली आहे, त्यांनी पाहणी करावीच त्यांच्या एका नातेवाइकाने या भागात नाल्याच्या भिंतीचे काम केले मात्र ते अवघ्या दीड महिन्यात ढासळले आहे. ते काम निकृष्ट होते, की गुणवत्तेचे याची माहितीही त्यांनी द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जागा हडपण्याचे कारस्थान

प्रभागातील अभ्यासिका आपण रद्द केल्याचा आरोप नगरसेविका बेंडाळे यांनी केला आहे, त्यावर बोलताना जोशी म्हणाले, २० ते २५ हजार स्क्वेअर फूट मनपाची जागा महापालिकेने दिली त्या ठिकाणी १२ बाय १० ची अभ्यासिका बांधून जागा गिळंकृत करण्याचे मनसुबे त्यांचे असल्यामुळे ही अभ्यासिका आपण रद्द केली. यावेळी जोशी यांनी नगरसेविका बेंडाळे यांच्यावर महापालिकेच्या महिला कामगारांकडून घरातील कामे करून घेतली जात असल्याचा आरोप केला, तसेच साफसफाईचा मक्ता असलेल्या मक्तेदारांकडून पाकिटे घेत असल्याचाही आरोप केला आहे. यावेळी महापालिकेतील शिवसेनेचे नेते नितीन लढ्ढा, नगरसेवक नितीन बरडे उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT