Lok sabha Election 2024 : नगर दक्षिण लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम जोरदार वाजू लागले आहेत. महायुतीचा उमेदवार जाहीर झाला आहे. तर महाविकास आघाडीकडून अजून उमेदवार निश्चित नाही. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. उमेदवार निश्चित होत असतानाच शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. यामुळे आमदार नीलेश लंके नगर दक्षिणेत तुतारी हाती घेणार, असे चित्र आहे.
यातच आमदार लंके यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य राणी लंके यांनी जामखेडमधील एका कार्यक्रमात नगर दक्षिणेत लंके कुटुंबीयच "तुतारी" वाजवणार, असा दावा केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पारनेरमधील आमदार नीलेश लंके हे शरदचंद्र पवार पक्षाकडून नगर दक्षिणची जागा लढविणार, अशी चर्चा आहे.
आमदार लंके यांनी शरद पवार यांची, तशी भेट घेतली. यामुळे आमदार लंके खासदारकी लढवणार ह्या चर्चांना सध्या उधाण आहे. मंत्री राधाकृष्ण विखे आणि आमदार नीलेश लंके यांच्यातील राजकीय विरोध पराकोटीवर पोहोचला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील आमदार लंके यांनी याबाबत तक्रार केली होती. भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी यावर चर्चा झाली. परंतु मार्ग निघाला नाही. यामुळे आमदार लंके यांनी विखेंविरोधात धार वाढवली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आमदार लंके आता अजितदादा यांच्या गटाला लवकरच सोडचिठ्ठी देणार, असे संकेत मिळतं आहेत. आमदार लंके यांनी शरद पवार यांची पुण्यात नुकतीच भेट घेतली होती. खरेतर तेव्हाच ते शरद पवार यांच्या गटात प्रवेश करतील अशा चर्चा होत्या. मात्र शरद पवार आणि आमदार लंके यांनी यासंदर्भात सध्या मौन बाळगले. या भेटीनंतर आमदार लंके यांचे सूर काहीसे आक्रमक झाले आहेत.
सोशल मीडियावर घड्याळाचा वापर कमी झाला आहे. "तुतारी"चा वापर तथा शरद पवार यांचा फोटो त्यांच्या बॅनरवर अधिक झळकू लागला आहे. आमदार लंके यांचा नगर दक्षिणमध्ये वाढत्या प्रसिद्धीमुळे मंत्री विखे यांनी भाजप पक्षांतर्गत असलेले आणि पक्ष विरहित असलेल्या विरोधकांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत.
दरम्यान, जामखेड येथील एका दुकानाचे उद्घाटन खासदार सुजय विखे यांच्या हस्ते झाले. खासदार विखे हे, निघून गेले आणि त्याचवेळी आमदार लंके यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणी लंके यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. राणी लंके यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला.
राणी लंके म्हणाल्या, "नगर दक्षिणची तुतारी आम्हीच वाजवणार असून आमच्या दोघांपैकी एकजण निवडणुकीला उभे रहाणार आहे. त्यामुळे नगर दक्षिणची 'तुतारी' लंके कुटुंबीयांकडेच असेल". लंके कुटुंबीयच विजयाची "तुतारी" वाजवणार असून जामखेड तालुक्यात आम्हाला भरघोस प्रतिसाद मिळत असून याच जोरावर आम्ही निवडणुकीला सामोरे जात असल्याचे राणी लंके यांनी सांगितले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.