J. P. Gavit Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

J P Gavit News : जे. पी. गावितांनी मंत्री दादा भुसेंसमोरच सरकारवर सोडले टीकास्त्र, म्हणाले...

Arvind Jadhav

Nashik Political News : 'सरकार शेतकरी व आदिवासी बांधवांच्या रास्त मागण्यांचा विचार करत नाही. आश्वासने देताना सरकार जोशात असते. मात्र, आश्वासनांची पुर्तता केली जात नाही. त्यामुळे पालकमंत्री दादा भुसे यांनी तातडीने बैठक घेऊन विनंती केली असली तरी पूर्वानुभव लक्षात घेता आम्ही मागे हटणार नाही. आम्ही आमचे नियोजित आंदोलन पार पाडूच.' असा इशारा माजी आमदार जे. पी. गावित यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्यासमोरच दिला.

शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाकडून मान्य करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व आदिवासींच्या विविध संघटनांतर्फे माजी आमदार जे. पी. गावित( J P Gavit ) यांच्या नेतृत्वाखाली 21 फेब्रुवारीपासून चांदवड, निफाड, सुरगाणा, पेठ, दिंडोरीसह इतर तालुक्यांतून हजारोंच्या संख्येने आंदोलनकर्ते नाशिकच्या दिशेने निघाले आहेत. आंदोलनकर्ते सोमवारी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या मोर्चाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी पालकमंत्री दादा भुसे यांनी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला भुसे यांच्यासह गावित हजर होते. बैठकीनंतर पत्रकाराशी संवाद साधताना गावित यांनी भुसे(Dada bhuse) यांच्यासमोरच सरकारवर तोफ डागली. या बैठकीत तोडगा निघणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून, आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम आहेत.

सर्व मागण्या मान्य होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांचे महामुक्कामी आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार गावित व पायी मोर्चात निघालेल्या आंदोलक शेतकऱ्यांनी शासन व प्रशासनास दिला आहे. या आंदोलनाला जिल्हाभरातून शेतकरी, कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

याबाबत बोलताना गावित म्हणाले की, 'कांदा निर्यात बंदी लादून सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक संकटात लोटले आहे. झालेला खर्चही शेतकऱ्यांच्या पदरात पडेना. अंगणवाडी सेविकांचा प्रश्न सरकारने प्रलंबित ठेवला आहे. यापूर्वी दोनदा मोर्चे काढले. आश्वासनांची खैरात मिळाली. पण पुर्तता झाली नाही. '

आजही पालकमंत्र्यांनी आश्वासने दिलीत. मात्र, आम्हाला याची आवश्यकता नाही. आमचे मोर्चेकर शहराच्या अगदी जवळ पोहचले आहेत. सोमवारी दुपारी ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पोहचतील. ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलनकर्ते मागे हटणार नाहीत, असा इशारा गावित यांनी यावेळी दिला. पालकमंत्री दादा भुसे यांनी वारंवार गावित यांची समजूत घातली. सरकारने काहीच केले नाही, असा आक्षेप चुकीचा असल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT