Jai Pawar Sarkaranama
उत्तर महाराष्ट्र

Jai Pawar : जय पवारांनी धमाल उडवून दिली, रोहित पवारांच्या बालेकिल्ल्यात येत भाजप...

Pradeep Pendhare

Ahmednagar News : राज्याच्या राजकारणात बारामती केंद्रस्थानी असते. लोकसभा निवडणुकीनंतर आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत तसंच चित्र उभं राहीलं आहे. लोकसभेला केंद्रस्थानी शरद पवार होते, तर आता अजित पवार आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या घोषणेनंतर अजित पवार यांनी त्यांचा लूक बदललाय.

तसं त्यांच्या मतदारसंघाबाबत देखील वेगळीच चर्चा आणि चाचपणी सुरू असल्याचे सांगितले जाते. अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या उमेदवारीचे संकेत अजित पवारांकडून मिळालेत. पण मतदारसंघ कोणता, हे अजून गुलदस्त्यात आहेत. बारामती मतदारसंघाची चर्चा होत असतानाच जय पवार यांनी कर्जत-जामखेडमध्ये आमदार रोहित पवार यांच्या बालेकिल्ल्यात आज हजेरी लावत धमाल उडवून दिली.

जय पवार यांनी कर्जत-जामखेडमध्ये येत भाजप (BJP) जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांच्यासह कार्यकर्त्यांशी संवाद साधला. प्रभू श्रीराम यांची प्रतिमा आणि श्रीमद्भागवत गीता देत जय पवार यांचा सत्कार करण्यात आला. राजेंद्र गुंड, अशोक जायभाग, जाकीर सय्यद, ओंकार गुंड, यशराज बोरा, संतोष धुमाळ कार्यकर्ते उपस्थित होते.

जय पवार आणि या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी राजकीय चर्चा रंगल्या होत्या. विधानसभा निवडणुकीला काय होईल, यावर देखील बरीच चर्चा झाली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कितपत परिणाम होईल, हे जय पवार यांनी या कार्यकर्त्यांकडून जाणून घेतले. योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांपर्यंत योजना घेऊन जाण्याचा सल्ला देखील जय पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. तसंच कर्जत-जामखेडमधील राजकीय परिस्थितीची देखील जय पवार यांनी माहिती करून घेतली. त्यामुळे जय पवार यांची ही भेट वेगळंच सांगून जाते आणि त्याची चर्चा सध्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात सुरू झाली आहे.

आमदार रोहित पवार यांचा कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ बालेकिल्ला आहे. परंतु या मतदारसंघावर अजित पवार यांचे देखील विशेष प्रेम राहिले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत 2019 मध्ये हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यातून घेताना अजित पवार यांनी येथे बरीच राजकीय ताकद उभी केली होती. अजित पवार (Ajit Pawar) आता महायुतीत भाजपसोबत आहेत. त्यामुळे या मतदारसंघाबाबत काय निर्णय घेणार, याची उत्सुकता आहे.

जय पवार भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी

यातच आमदार रोहित पवार यांनी तीन दिवसांपूर्वी अजित पवार कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवतील, असे संकेत दिले होते. यावर बरंच राजकारण पेटलं होतं. तसंच जय पवार यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून संधी दिली जाईल, असे सांगितले जात आहे. पण अजित पवार आणि जय पवार यांच्याकडून याबाबत अजून तरी कोणतेही भाष्य झालेले नाही. पण यातच जय पवार यांनी कर्जत-जामखेडमध्ये आमदार रोहित पवार यांच्या बालेकिल्ल्यात हजेरी लावल्याने आणि भाजपचे सरचिटणीस सचिन पोटरे यांच्या घरी गेल्याने चर्चेला उधाण आलं आहे. अजित पवार आणि जय पवार नेमकं कोणता राजकीय डाव टाकत आहे, याचा अंदाज सध्या तरी कोणाला येत नसल्याने वेगवेगळ्या राजकीय चर्चेला पेव फुटले आहे.

कर्जत-जामखेड केंद्रस्थानी राहणार

बारातमी विधानसभा मतदारसंघाबाबत अजित पवार यांनी तीन दिवसांपूर्वी मोठं विधान केले होते. मी सात-आठ वेळा आमदार म्हणून निवडून आलो आहे. आता मला रस नाही. जय पवार यांच्याबाबत जनता आणि कार्यकर्ते निर्णय घेतील, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. यानंतर विधानसभा निवडणुकीत बारामतीत अजित पवारांकडून जय पवार रिंगणात येणार, अशा चर्चा सुरू झाल्या. याचबरोबर अजित पवार कर्जत-जामखेडमधून निवडून लढणार, असे देखील राजकीय अंदाज बांधले जात आहे. आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेडमध्ये होत असलेल्या सर्व्हेवरून तसे विधान देखील केले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत बारामतीबरोबर कर्जत-जामखेड केंद्रस्थानी राहणार असे दिसते.

युगेंद्र, रोहित यांच्यासमोर कोणाचे आव्हान

दरम्यान, लोकसभा निवडणुकीपासून बारामतीत युगेंद्र पवार प्रचंड सक्रिय आहेत. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना बारामतीमधून सुमारे 44 हजार मतांचा मताधिक्य आहे. युगेंद्र पवार यांनी येथे प्रचाराची धुरा संभाळली होती. अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना युगेंद्र पवार यांनी आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीचा स्पष्ट संकेत आहेत. पण युगेंद्र पवार यांच्यासमोर कोणाचे आव्हान असेल, हे अजून तरी गुलदस्त्यात आहेत. त्याचपद्धतीने आमदार रोहित पवार यांना देखील त्यांच्या मतदारसंघात आव्हान कोणाचे असेल, यासंदर्भात तर्कविर्तक लढवले जात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT