जळगाव : अमरावती (Amaravati Corporation) महापालिकेने नव्याने सर्वेक्षण (Survey) करून मालमत्ता करवाढ (Property Tax) केली आहे, ती रद्द करण्याची मागणी तेथील भाजपचे (BJP) गटनेते तुषार भारतीय (Tushar Bhartiya) यांनी केली होती. त्यानुसार फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी स्थगिती दिल्याचे सागंण्यात येत आहे. जळगावचीही (Jalgaon) परिस्थिती तीच असल्यामुळे महापालिकेने तब्बल २० वर्षांनंतर केलेल्या मालमत्ता करवाढीला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी आता जळगावकरांकडून होत आहे. (Jalgaon Municiple corporatin hike in property tax)
यासंदर्भात ‘महापालिकेने वीस वर्षांनंतर केलेल्या करवाढीला आपण स्थगिती दिली. वीस वर्षांनी एकदम बोझा जनतेवर टाकणे चुकीचे आहे, त्यामुळेच आपण त्याला स्थगिती दिली आहे,’ असे ट्विट उपमुख्यमंत्री व अमरावतीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
अमरावती ही ‘ड’ वर्ग महापालिका आहे, त्या ठिकाणी २००५-२००६ नंतर आता २०२२ मध्ये मालमत्ता कराचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना नवीन घरपट्टी बिलात तब्बल १२० टक्के करवाढ करण्यात आल्याचे माजी सभागृहनेता तुषार भारतीय यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले होते. दोन वर्षात कोविडची परिस्थिती होती. त्यामुळे नागरिकांची आर्थिक परिस्थिती बेताची झाली आहे.
या परिस्थितीत मालमत्ता करवाढ सयुक्तिक ठरणार नाही. त्यामुळे वाढीव मालमत्ता कराला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणीही भारतीय यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात केली होती.
फडणवीसांचे ट्विट
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी (ता.७) सायंकाळी सहा वाजून बेचाळीस मिनिटांनी ट्विट करून अमरावती महापालिकेने केलेल्या मालमत्ता करवाढीस स्थगिती दिली असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी दोन ट्विटमध्ये म्हटले आहे, की महापालिकेने मालमत्ता करात केलेली वाढ स्थगित करण्याचे आदेश मी दिले आहेत. दर पाच वर्षानी आढावा घेतला पाहिजे; पण वीस वर्षानी एकदम वाढ झाली आहे. त्यामुळे जनतेवर एकदम बोजा टाकणे चुकीचे आहे, त्यामुळे त्याला स्थगिती दिली आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे, की महापालिकेचे उत्पन्न वाढलेच पाहिजे. पण, लोकांच्या डोक्यावर बसून घेऊन चालणार नाही. कोरोनातून लोक नुकतेच बाहेर पडले आहेत, त्यांच्यावर आर्थिक बोजा टाकणे योग्य नाही.
आता जळगावकरांनाही आशा
फडणवीस यांनी अमरावती महापालिकेच्या मालमत्ता करास स्थगिती दिल्याचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामुळे आता जळगावकर नागरिकांनाही मालमत्ता करवाढीस स्थगिती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार जळगावतही अमरावती महापालिकेसारखीच स्थितीत जळगाव महापालिकेनेही मालमत्ता करवाढ एकदम वीस वर्षांनी केली आहे. अनेक नागरिकांना १५० ते २०० टक्के करवाढीचे बिले आली आहेत.
कोरोनामुळे जळगावकर नागरिकांचीही आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली, अशा स्थितीत या करवाढीचा मोठा बोजा पडला आहे. अनेकांनी आकारणी कमी करण्यासाठी अर्ज दिले. परंतु त्याचा फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. कोरोनाकाळात जळगावतील नागरिकांचीही आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली आहे. त्यात मालमत्ता करवाढीचा मोठा बोजा जळगावकरांना पडला आहे. त्यामुळे अमरावतीप्रमाणे जळगाव महापालिकेतही करवाढीला स्थगिती द्यावी, अशी मागणी होत आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अमरावती महापालिकेने लागू केलेली मालमत्ता करवाढ स्थगित करण्याच्या ट्विटची आपण माहिती घेत आहोत. अमरावतीप्रमाणे जळगाव महापालिकेच्या करवाढीला स्थगिती देण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांना पत्र देवून मागणी करणार आहोत.
- सुरेश भोळे, आमदार, जळगाव
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.