Bhagat Singh Patil resignation Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress setback : मनावर दगड ठेवून 45 वर्षांची निष्ठा संपवली, खान्देशात आणखी एका पदाधिकाऱ्याने कॉंग्रेस सोडली..

Bhagat Singh Patil resignation : खान्देशात कॉंग्रेसला नुसते धक्क्यावर धक्के बसत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असतानाच पक्षाला मोठी गळती सुरु झाली आहे.

Ganesh Sonawane

Jalgaon Congress crisis : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी खान्देशात कॉंग्रेसला धक्क्यावर धक्के बसत असून अनेक महत्वाचे पदाधिकारी व नेते एक-एक करत पक्षाला सोडचिठ्ठी देताना दिसत आहे. काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी पक्षाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यानंतर आता जळगाव जिल्ह्यातील आणखी एका पदाधिकाऱ्याने आपल्या पदाचा डकाफडकी राजीनामा दिला आहे.

45 वर्षांची निष्ठा संपुष्ठात आणत माजी जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. स्थानिक आणि जिल्हास्तरावरील पक्षातील गटबाजी, होणारा अपमान आणि दुर्लक्षित वृत्तीमुळे आपल्याला हा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी सांगितले. प्रतिभा शिंदे यांच्या पाठोपाठ भगतसिंह पाटील यांनी राजीनामा दिल्याने जळगावात कॉंग्रेसला बसलेला हा दुसरा मोठा धक्का मानला जात आहे.

भगतसिंग पाटील हे सध्या रावेर लोकसभा जळगाव जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष व महाराष्ट्र एस.टी वर्क्स काँग्रेस (इंटक)चे विभागीय अध्यक्ष होते. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे कार्याध्यक्षपदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा त्यांनी सुपूर्त केला आहे. तसेच इंटकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्याकडे विभागीय अध्यक्षपदाचे राजीनामा त्यांनी पाठवून दिला आहे. धक्कादायक म्हणजे, जळगाव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष यांच्या कार्यपद्धतीला व निष्क्रियतेला कंटाळून त्यांनी राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.

यासंदर्भात त्यांनी भावनिक अशी फेसबुक पोस्ट केली आहे. ज्या पोस्टची जिल्हाभरात चर्चा आहे. त्यांनी म्हटलं आहे की, काँग्रेस मधील माझ्या 45 वर्षांच्या प्रवासाला अखेर मनाविरुद्ध पूर्णविराम देत आहे. आज माझ्यासाठी हा अत्यंत कठीण आणि भावनिक क्षण असून अगदी मनावर दगड ठेवत मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत आहे.

त्यांनी पोस्टमध्ये पुढे म्हटलं आहे की, गेली ४५ वर्षे मी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. माझं राजकीय आयुष्य, माझं योगदान आणि माझी निष्ठा हे सर्व या पक्षासाठी संपूर्णपणे समर्पित राहिले आहे. परंतु गेल्या काही काळापासून स्थानिक व जिल्हास्तरीय नेत्यांमधील अंतर्गत गटबाजी, कुरबुरी, भेदभाव आणि अपमानास्पद वातावरणामुळे पक्षात काम करणं कठीण झालं आहे. एकजूट, सन्मान आणि विचारांना स्थान असलेलं वातावरण हळूहळू हरवत चाललं आहे, आणि अशा परिस्थितीत काम करणं शक्य नसून आता पुढे जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही.

मी कधीही कोणत्याही अपेक्षेने नव्हे तर निष्ठा आणि कर्तव्यभावनेने पक्षासाठी काम केलं. पण जेव्हा तुमचा अनुभव, तुमचं कार्य आणि तुमचा आवाज वारंवार दाबला जातो, दुर्लक्षित केला जातो, तेव्हा अशा परिस्थितीत पक्षात राहून कार्य करणे शक्य होत नाही. म्हणूनच आज मी अत्यंत भावनिक पण ठाम निर्णय घेत, माझा ४५ वर्षांचा काँग्रेसमधील प्रवास थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय इतका सहज किंवा सोपा नव्हता, परंतु पक्षातील काही नेत्यांनी निर्माण केलेल्या सध्याच्या परिस्थितीमुळे मला हे पाऊल उचलण्यास भाग पाडले आहे.

काँग्रेस पक्षावर व राष्ट्रीय नेतृत्वावर विश्वास तथा प्रेम होतं, आहे आणि सदैव राहणार. काँग्रेस आमच्या विचारांमध्ये, रक्तात आणि श्वासात असून तिथून तिला कोणीही मीटवू शकत नाही. पुढचा प्रवास — नवीन पक्ष, नवीन दिशा, पण जुन्याच मूल्यांसह — सुरू राहील ! असं त्यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT