Jalgaon Sand Mafia Sharad Patil Murder : Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Crime News : वाळू माफियांविरोधात साक्ष दिली, शेतकऱ्याचा काटा काढला, डंपरखाली चिरडून हत्या

Jalgaon Sand Mafia Sharad Patil Murder : जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांनी हैदोस घातला असून विरोधात साक्ष देणाऱ्या शेतकऱ्याला ठार मारलं आहे,. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ganesh Sonawane

Jalgaon Sand Mafia Farmer Murder : जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांनी हैदोस घातला आहे. अवैध वाळू वाहतुकीस विरोध केल्याने व आपल्या विरोधात साक्ष देत असल्याच्या रागातून शरद पाटील नावाच्या शेतकऱ्यांच्या अंगावर वाळूचा डंपर घालून चिरडून ठार मारले. तालुक्यात नांद्रे गाव फाट्यावर ही घटना घडली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी या घटनेचा जाब आपण महसूल मंत्र्यांना विधान भवनात विचारणार असल्याचं म्हटलं आहे. शरद पाटील यांनी रेती माफियांच्या विरोधात आवाज उठविला नसता तर त्यांचा जीव वाचला असता. मात्र जिल्ह्यात रेती माफियांच्या वाढत चाललेल्या मुजोरी बाबत आपण पोलिस अधीक्षक,जिल्हाधिकारी, आणि महसूल मंत्र्यांच्या सोबत चर्चा केली असून, धान भवनात आपण महसूल मंत्र्यांना जाब विचारणार असल्याचं अनिल पाटील म्हणाले.

याबाबत चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून डंपर चालकाला अटक करण्यात आली आहे. शरद रतन पाटील(५२, रा. नगाव, ता. अमळनेर) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. तर विपुल किरण गोसावी, सागर संजय गोसावी, मयूर अनिल बोरसे आणि डंपरचालक भरत सुभाष पाटील (३५) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत ज्ञानेश्वर काळूगिर गोसावी (रा. नगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, २८ ऑक्टोबरला सायंकाळी ज्ञानेश्‍वर अंगणात दुचाकी लावत असताना, विपुल किरण गोसावी, सागर संजय गोसावी, मयूर अनिल बोरसे वाळू उतरविण्यासाठी ट्रॅक्टर मागे घेत होते. ट्रॅक्टरचा धक्का लागल्याने ज्ञानेश्‍वरने जाब विचारला, म्हणून विपुल, सागर व मयूर यांनी ज्ञानेश्‍वर व त्यांच्या पत्नीला मारहाण केली व ट्रॅक्टर बाजूलाच खाली केले. याबाबत ज्ञानेश्वरने अमळनेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दुसऱ्या दिवशी तलाठी महेंद्र पाटील यांनी पंचनामा केला, तेव्हा शरद रतन पाटील साक्षीदार झाले. विरोधात साक्ष दिल्याने संशयितांनी पाटील यांना धमकावलं होतं.

दरम्यान, शनिवारी (ता. ३१) रात्री पावणेदहाला पोलिसपाटील प्रवीण गोसावी यांच्या वाढदिवसानिमित्त शरद पाटील यांच्यासह काही लोक सावखेडा येथील देव हॉटेलवर जेवण्यासाठी जाताना नांद्री बसथांब्यावर थांबले. त्यावेळी पातोंड्याकडून भरधाव आलेली कार महेश आत्माराम पाटील यांना कट मारून पुढे जाऊन थांबली. त्यातून विपुल गोसावी, मयूर बोरसे व सागर गोसावी उतरले. त्याचवेळी पातोंड्याकडून आलेल्या डंपर (एचआर ३७, डी ८९५७)मधून उतरलेला चालक भरत सुभाष पाटील याने शिवीगाळ केली. त्यानंतर भरत पाटीलने डंपर सुरू करून आणला असता, विपुल गोसावी व मयूर बोरसेने शरद पाटील यांना वाहनासमोर ढकलले. डंपर अंगावरून गेल्याने शरद यांच्या दोन्ही पायांचा चेंदा-मेंदा होऊन गंभीर जखमी झाला. त्यानंतर ते चौघे पळून गेले. शरद यांना रुग्णवाहिकेतून अमळनेरच्या नर्मदा फाउंडेशनमध्ये दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना धुळे येथे रवाना केले. मात्र, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

रात्री आमदार अनिल पाटील यांनी तातडीने दवाखान्यात भेट घेऊन उपचारासाठी ५० हजारांची मदत केली. उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांनी भेट दिली. आमदार पाटील यांनी पोलिस अधीक्षकांशी चर्चा केल्यानंतर जिल्हाभर यंत्रणा हलली व दहिवद फाटा पिंपळीमार्गे पळून गेलेले डंपर बुधगाव येथे पकडण्यात आले. चालकाला रात्रीच अटक केली. याबाबत चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे तपास करीत आहेत. तीन संशयित फरारी झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT