Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या उर्वरित नऊ जागांसाठी आज ९७.६ टक्के मतदान झाले. काही ठिकाणी अपवाद वगळता शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडली. एकूण २९२१ मतदारांपैकी २८३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यापूर्वी बारा जागांवर बिनविरोध निवड झाली आहे.
आता नऊ जागांसाठी २९ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात एकूण ३० केंद्रांवर मतदान झाले. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी दोन मतदान केंद्र होती. या निवडणुकीत महायुतीचे सहकार पॅनल विरुद्ध काँग्रेस- शेतकरी संघटनेचे शेतकरी पॅनल यांच्यात सरळ लढत झाली आहे.
या निवडणुकीत मुक्ताईनगर व चाळीसगाव येथील दोन लढतीकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागूले आहे. मुक्ताईनगर तालुक्यात भाजपच्या उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याविरुद्ध शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील गटाच्या उमेदवार देवयानी देशमुख यांच्यात लढत होत आहे.
मुक्ताईनगर येथील मतदान केंद्रात रक्षा खडसेंनी प्रोटोकॉल (सुरक्षा रक्षकांना) सोबत नेल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला. अशा प्रकारे सिक्यूरिटी सोबत नेता येते का, अशी विचारणा करीत आमदार पाटील यांनी पोलिस अधीक्षक, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रारी केली. रक्षा खडसेंकडून मतदारांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला.
आमदार पाटील यांनी केलेले सर्व आरोप केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी फेटाळून लावले आहेत. ‘शासनाने माझ्या सुरक्षेसाठी दिलेला प्रोटोकॉल माझ्यासोबतच राहणार, त्यात गैर काय’, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच तीन ठिकाणी मतदान असल्याच्या आरोपावर सहकार क्षेत्रात तसा काही नियम नाही. माझे तीन ठराव झाले म्हणून तीन ठिकाणी मतदान केल्याचं त्या म्हणाल्या. असे अनेक मतदार आहेत, ज्यांचे पाच-पाच सहा-सहा ठिकाणी मतदान आहे. या सहकारच्या निवडणुकीत तसे बंधन नसते असं रक्षा खडसे म्हणाल्या. आज दिवसभर हाच विषय सोशल मिडीयावरही चर्चेला होता.
चाळीसगाव तालुक्यात भाजपचे उमेदवार आमदार मंगेश चव्हाण यांच्याविरुद्ध शिवसेनेचे उमेदवार नारायण पाटील, विजय पाटील यांच्यात चुरशीची लढत झाली आहे. या दोन लढतींचा निकाल काय लागतो याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
मतदानादरम्यान चाळीसगाव केंद्रावर शाब्दिक वाद झाल्याची घटना घडली. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार उन्मेष पाटील यांचा मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांशी वाद झाला. दोन मतदारांकडे अनफिट सर्टिफिकेट नसल्याने त्यांच्यासोबत आलेल्या दोन व्यक्तींच्या उपस्थितीवर उन्मेष पाटील यांनी आक्षेप घेतला. यावरून त्यांची अधिकाऱ्यांशी शाब्दिक चकमक झाली. परिस्थिती चिघळू नये म्हणून अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
विशेष म्हणजे, या निवडणुकीत उन्मेष पाटील स्वतः मतदान केंद्रावर पोलिंग एजंट म्हणून जबाबदारी पार पाडताना दिसले. चाळीसगाव सोसायटी मतदारसंघातील लढतीमुळे या केंद्रावरील मतदानाकडे विशेष लक्ष होते. भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे दोन बंडखोर उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान घडलेल्या या प्रकाराची चर्चा रंगली.
बारापर्यंत निकाल शक्य
या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (ता. ३०) सकाळी ९ वाजे पासून जळगावमधील महाबळ रस्त्यावरील सैनिक कल्याण हॉलमध्ये होणार आहे. दुपारी बारा ते साडेबारापर्यंत नऊ जागांचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. एकूण १५ टेबलांवर मतमोजणी होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.