Sumit Patil's Nomination Rejected in Jalgaon DCC Bank Election : शिवसेना आमदार किशोर पाटील यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी त्यांचे पुत्र सुमित पाटील यांनी पाचोरा तालुका प्राथमिक कृषी पतपुरवठा विकास सेवा संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज अवैध ठरवला आहे. सुमित पाटील यांचा अर्ज बाद झाल्याने भाजप उमेदवार सतीश शिंदे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
अर्ज बाद झाल्यानंतर सुमित पाटील यांनी जिल्हा बॅंकेत प्रचंड संताप व्यक्त केला. त्यांनी बँकेच्या सभागृहाच्या बंद दरवाजाला लाथा मारत अर्ज बाद झाल्याचा संताप व्यक्त केला. माझा अर्ज राजकीय दबावापोटी निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद केला आहे, असा आरोप सुमित पाटील यांनी केलाय.
सुमित पाटील यांच्या उमेदवारीवर भाजपचे उमेदवार सतीश परशुराम शिंदे यांनी आक्षेप घेतला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे त्यांनी हरकत नोंदवली होती. दरम्यान, हरकतींवरील सुनावणी आणि छाननीनीच्या प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी यांनी सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर केला. त्यामुळे भाजपचे उमेदवार सतीश शिंदे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे.
दरम्यान यावर आता आमदार किशोर पाटील काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. कारण, मुलाचा उमेदवारी अर्ज बाद होणे हा आमदार पाटील यांच्यासाठी केवळ निवडणुकीच्या दृष्टीने नव्हे, तर राजकीय प्रतिष्ठेच्या दृष्टीनेही मोठा धक्का मानला जात आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपले राजकीय अस्तित्व आणि प्रभाव कायम ठेवण्याच्या दृष्टीने किशोर पाटलांसाठी ही जागा अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. मात्र, अर्ज नामंजूर झाल्याने या मतदारसंघातील समीकरणे बदलली आहेत.
दरम्यान, यापूर्वी शिवसेना शिंदे गटाच्या दोन व भाजपची एक अशा तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. आता भाजपचे सतीश शिंदे हे बिनविरोध झाल्याने शिवसेनेच्या बरोबरीने भाजपच्या दोन जागा बिनविरोध झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आता पुढील घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.