Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आज माघारीचा दिवस असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीत एकीकडे महायुतीचा दोन जागांवरील अद्याप तिढा सुटलेला नाही, दुसरीकडे महाविकास आघाडीला एक जागा देऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी देखील महायुतीच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट मंत्री गिरीश महाजन यांच्याशी फोनवरुन संपर्क साधल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीत जागावाटपावरून ओढाताण सुरू आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला सोबत घेत निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी गिरीश महाजन यांच्याशी थेट संपर्क साधला असून स्वतः गिरीश महाजन यांनी त्याबाबतीत पत्रकारांना माहिती दिली.
महाविकास आघाडीला एक जागा देऊन इतर सर्व ठिकाणी त्यांच्या उमेदवारांनी माघार घेण्याबाबतचा प्रस्ताव आला आहे. यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे व मंत्री गिरीश महाजन यांच्यात चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. दोघांमध्ये झालेल्या चर्चेमुळे निवडणुकीची दिशा बदलण्याची शक्यता आहे. अंतिम निर्णय काय होता याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सोसायटी मतदारसंघ वगळून अन्य सहा जागांपैकी एक जागा महाविकास आघाडीला देण्याची तयारी महायुतीने दर्शवली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या वाट्याला कोणती जागा येणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. एका जागेच्या बदल्यात महाविकास आघाडी ही महायुती विरोधातील सर्व अर्ज मागे घेण्यास तयार होईल का हाही प्रश्न आहे. कारण काल झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव बारगळल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान आतापर्यंत महायुतीच्या पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत. एकूण २१ जागांपैकी जवळपास ६० टक्के जागा बिनविरोध होतील असा अंदाज मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आज माघारीच्या दिवशी आणखी काही उमेदवार माघार घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक किती जागांवर होणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.