

Hina Gavit Questions Goval Padvi's Remarks on Janjati : नंदुरबारचे खासदार अॅड. गोवाल पाडवी यांनी जनजाती गौरव दिनाबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी पाडवी यांच्या भूमिकेवर आक्षेप घेत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यावर आक्षेप घेणाऱ्यांनी आधी भारतीय संविधानाचा अभ्यास करावा, असा टोला हिना गावित यांनी लगावला. अॅड. गोवाल पाडवी स्वतःला वकील म्हणवतात; मात्र त्यांची वकिलीची पदवी तपासून पाहण्याची गरज आहे. कारण, 'जनजाती' हा शब्द संविधानात वापरला आहे, याचीही त्यांना माहिती नाही, अशा शब्दांत गावित यांनी पाडवी यांच्यावर निशाणा साधला.
आदिवासी समाजाचे थोर नेते धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात गैर काय आहे, असा सवालही हिना गावित यांनी उपस्थित केला. 'जनजाती गौरव दिन' साजरा करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी पाडवी यांची भूमिका असेल, तर कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल करायचा, हे त्यांनी वकील म्हणून स्पष्ट करावे, असे गावित म्हणाल्या. उलट भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीला विरोध करणाऱ्यांवरच देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
जनजाती हा शब्द भाजप किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेला नाही. भारतीय संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच 'अनुसूचित जनजाती' असा उल्लेख केला आहे. त्यामुळे या शब्दाच्या वापरावर आक्षेप घेण्यापूर्वी संविधानाचा अभ्यास करणे आवश्यक आहे, असे हिना गावित यांनी स्पष्ट केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे पाडवी यांना शोभत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. निवडणूक प्रचारादरम्यान पाडवी यांनी हातात संविधान घेऊन प्रचार केला होता. केवळ फोटोसेशनसाठी संविधान हातात घेण्याऐवजी त्याचे वाचन केले असते, तर अशा प्रकारचे वक्तव्य केले नसते, असा टोला गावित यांनी लगावला.
गोवाल पाडवी नेमके काय म्हणाले होते?
खासदार गोवाल पाडवी यांनी जनजाती गौरव दिन साजरा करण्याच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली होती. ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो. मात्र, या दिवसाचे महत्त्व कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून जनजाती गौरव दिन साजरा केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
आदिवासींना 'जनजाती' किंवा 'वनवासी' असे संबोधणे हा जगभरातील आदिवासी समाजाचा अपमान असल्याचे मत व्यक्त करत संबधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पाडवी यांनी केली. त्यांच्या याच वक्तव्यावरून आता हिना गावित यांनी आक्षेप घेत प्रत्युत्तर दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.