Jalgaon District Bank Election Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon District Bank Election: महायुतीला मोठा धक्का! गिरीश महाजन अन् गुलाबराव पाटलांचा 'बिनविरोध' पॅटर्न फेल; आता नवी खेळी काय?

Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीच्या गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांचे बिनविरोध निवडीचे स्वप्न भंगले आहे. आता नेते कोणती राजकीय रणनीती आखणार? जाणून घ्या.

Sampat Devgire

Girish Mahajan News: जळगाव जिल्हा बँकेत माघारीचा शेवटचा दिवस राजकीय घडामोडी आणि कुरघोडींनी गाजला. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गातील अडथळा कायम राहिला. त्यामुळे बिनविरोधचा मार्ग खुंटला.

जळगाव जिल्हा बँकेत 21 जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांसह बहुतांश आमदारांनी आपले वारसदार मैदानात उतरवले आहेत. त्यामुळे महायुती या निवडणुकीत संपूर्ण ताकदीनिशी मैदानात आहे.

उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अंमळनेर गटातून भाजपचे प्रफुल्ल पवार यांनी माघार घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भाईदास पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील बिनविरोध झाल्या. आतापर्यंत महायुतीचे तीन तर महाविकास आघाडीच्या श्रीमती पाटील असे चार बिनविरोध संचालक झाले आहेत.

महाविकास आघाडीने महायुतीकडे जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी चार जागांचा प्रस्ताव दिला होता. यामध्ये मुक्ताईनगर, भडगाव, चोपडा आणि अमळनेर या चार जागांचा समावेश होता. भाजपने ते गिरीश महाजन यांनी अंमळनेरची जागा महाविकास आघाडीला सोडत भाजप उमेदवाराला माघार घेण्याचे सूचना केली.

मंत्री महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अमळनेरची एक जागा महाविकास आघाडीला सोडली. त्यामुळे आता जागा वाटपात भाजप नऊ शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला सात तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला चार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला एक असे जागावाटप झाले आहे.

जागा वाटप करतानाही अमळनेरची जागा सोडून गिरीश महाजन यांनी मोठी खेळी केली आहे. अनिल पाटील यांना मार्ग मोकळा करून देतानाच एकनाथ खडसे या आपल्या परंपरागत विरोधकांची कोंडी केली. त्यामुळे खडसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जिल्हा बँकेत अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.

या निवडणुकीत पॅनलचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर दोन उमेदवार आहेत. वरच्या दिवशी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी माघार घेतली तरीही गुलाबराव पाटील यांच्या बिनविरोधचा मार्ग मोकळा होऊ शकला नाही. मंत्री गिरीश महाजन यांची स्थिती ही अशीच आहे. त्यांच्या गटात अद्यापही विरोधकांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. या जामनेर गटात 94 मतदार असून त्यापैकी 85 मतदार भाजपचे असल्याचा दावा मंत्री महाजन यांनी केला आहे.

त्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाही बिनविरोध साठी प्रतिस्पर्ध्यांची माघारी घेण्याचे राजकारण सुरूच राहणार आहे. निवडणूक बिनविरोध करण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री महाजन यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही. यासाठी संबंधित नेते आणि विरोधकांचे रात्रभर खलबते सुरू होते. त्यामध्ये महाविकास आघाडीचे नेतेही सहभागी झाले. मात्र शह, काटशह यामुळे राजकीय गुंता सुटू शकला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT