Girish Mahajan - Gulabrao Patil
Girish Mahajan - Gulabrao Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

जळगावात गिरीश महाजन विरुद्ध गुलाबराव पाटील संघर्ष आता दिसणार...

कैलास शिंदे

जळगाव : खानदेशातील जळगाव जिल्ह्यात चार आमदार आणि एक शिवसेना पुरस्कृत आमदार अशा पाचजणांच्या बंडाने शिवसेना पुरती घायाळ झाली आहे. त्यामुळे पक्ष बळकटीचे मोठे आव्हान पक्ष नेतृत्वासमोर असेल.

महाराष्ट्रात मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेना १९६६ मध्ये स्थापन झाली. मात्र राज्यात खऱ्या अर्थाने शिवसेनेचे जाळे विस्तारण्यासाठी १९८६ वर्ष उजाडावे लागले. जळगाव जिल्हा शिवसेना संघटना वाढीप्रमाणेच फुटीचाही साक्षीदार ठरला आहे. शिवसेनेत काहीही झाली की, त्याचे राजकीय हादरे जळगाव जिल्ह्यातही बसतात. आता तर जिल्ह्यातील शिवसेनेचे चार आणि एक शिवसेना पुरस्कृत अपक्ष आमदाराचा बंडात समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, पारोळ्याचे ज्येष्ठ नेते चिमणराव पाटील, पाचोऱ्याचे किशोर पाटील, चोपड्याच्या लता सोनवणे हे आमदार, तसेच मुक्ताईनगरच्या शिवसेना पुरस्कृत अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील शिंदे यांच्या गटात सहभागी आहेत. गुलाबराव पाटील कट्टर शिवसैनिक आहेत. ते १९९९मध्ये प्रथम एरंडोलमधून शिवसेनेने आमदार झाले. त्यानंतर २००९पर्यंत याच मतदार संघाचे आमदार होते. २००९ मध्ये जळगाव ग्रामीण मतदार संघातून पराभूत झाले. २०१४ व २०१९ असे दोनदा ते पुन्हा शिवसेनेतर्फे जळगाव ग्रामीण मतदार संघातून निवडून आले. चिमणराव पाटील २००९ मध्ये पारोळा मतदार संघातून शिवसेनेतर्फे विधानसभेवर गेले, त्यानंतर २०१९ मध्ये ते पुन्हा शिवसेनेतर्फे आमदार झाले. पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील हे याच मतदार संघातील शिवसेनेचे माजी आमदार (कै.) आर. ओ. पाटील यांचे वारसदार आहेत. ते पोलिस दलात होते, त्यांचे काका आमदार आर. ओ. पाटील यांनी त्यांना राजकारणात आणले. २०१४ आणि त्यानंतर पुन्हा २०१९ मध्ये शिवसेनेतर्फे विधानसभेत निवडून गेले.

चोपड्याच्या आमदार लताताई सोनवणे यांचे मूळ घराणे कॉंग्रेसचे, त्यांचे सासरे (कै.) बळीराम सोनवणे काँग्रेस जि. प. सदस्य तर पती, चंद्रकांत सोनवणे शिवसेनेचे आहेत. त्यांनी जळगाव मतदार संघातून शिवसेनेतर्फे प्रथम निवडणूक लढविली, मात्र ते पराभूत झाले. मात्र २०१४ मध्ये चोपडा मतदार संघातून चंद्रकांत सोनवणे शिवसेनेचे आमदार झाले. मुक्ताईनगर मतदार संघातील अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे मूळ शिवसैनिक आहेत. ते जिल्हाप्रमुख आहेत. प्रथमच ते २०१९ अपक्ष आमदार निवडून आले, त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठिंबा दिला होता.

मतदार संघात किरकोळ विरोध
जिल्ह्यातील शिवसेनेचे चार व अपक्ष एक आमदार शिंदे गटाला मिळाल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधातील किरकोळ आंदोलन वगळता इतर आमदारांच्या मतदार संघातही फारसे विरोधाचे पडसाद उमटलेले नाहीत. हे आमदार कोणत्या तरी दबावाखाली शिवसेना सोडून गेले, अशी भूमिका आजही शिवसैनिकांत आहे. जिल्हास्तरावर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांत तीव्र संताप आहे. जळगाव, पाचोरा तसेच इतर तालुक्यात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली. गुलाबराव पाटील यांच्या समर्थनार्थ धरणगावात रॅली काढण्यात आली. मुक्ताईनगर येथे चंद्रकांत पाटील यांनाही पाठिंबा व्यक्त करण्यात आला.


निवडणुकीवेळी लागणार कस
जिल्ह्यातील या बंडामागे भाजप असल्यामुळे भाजप अधिक बळकट होणार आहे. भाजपचे गिरीश महाजन या बंडामागे असल्याने जिल्ह्यात त्यांचे नेतृत्व उजळून निघेल, तर बंडखोर आमदारांच्या मतदार संघात विधानसभा उमेदवारीत मोठा पेच उभा राहणार आहे. पाचोऱ्यातून भाजपचे अमोल शिंदे तयारी करीत आहेत, मुक्ताईनगरमधून भाजपचे अशोक कांडेलकर अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत आहेत. एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेल्यानंतर त्यांचा उमेदवारीचा मार्ग सुकर होता, परंतु चंद्रकांत पाटील यांच्या बंडामुळे अडचण येण्याची शक्यता आहे. चोपड्यातून भाजपचे जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणेंची तयारी चालली आहे. पारोळा मतदार संघात भाजपतर्फे मच्छिंद्र पाटील, तर जळगाव ग्रामीणमध्ये चंद्रकांत अत्तरदे तयारी करीत आहेत.

तुझं-माझं जमेना पण...
भाजपचे खासदार उन्मेष पाटील व बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांचे वैर आहे, तर बंडखोर आमदार चिमणराव पाटील व गुलाबराव पाटील यांचे अद्यापही जमत नाही. पाचोऱ्याचे शिवसेना बंडखोर किशोर पाटील व भाजप नेते गिरीश महाजन यांच्यात वाद आहेत. त्यामुळे निवडणुकीत हे वादही उफाळण्याची शक्यता आहे. जळगाव ग्रामीण मतदार संघात गुलाबराव पाटील हे प्रबळ नेतृत्व होते, मात्र त्यांच्या इतके प्रबळ नसले तरी जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ हे नेतृत्वासाठी सक्षम आहेत. पारोळा येथे जिल्हाप्रमुख हर्षल माने शिवसेनेचे दावेदार आहेत, परंतु पारोळा, चोपडा व मुक्ताईनगरमध्ये सध्या तरी शिवसेना नेतृत्वामध्ये कमतरता जाणवते. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात शिवसेनेला बळकटीसाठी मोठे कष्ट घ्यावे लागतील.

- मंत्र्यासह चार आमदारांच्या बंडाने शिवसेनेत नेतृत्वाची पोकळी
- स्थानिक गणितांची बंडामुळे फेरमांडणी करावी लागणार
- शिवसेनेसमोर पक्ष बळकट करण्याचे कडवे आव्हान
- दुसऱ्या फळीच्या प्रभावी कार्यक्षमतेवरच सारी भिस्त
- पारोळा, चोपडा, मुक्ताईनगरमध्ये नेतृत्वाची कमतरता

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT