पुणे : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील सुमारे २० आमदार संपर्कात असल्याचा खोटा प्रचार शिवसेनेकडून करण्यात येत असल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी आज केला. खोटा प्रचार करण्यापेक्षा तुमच्या संपर्कात असलेल्या एकातरी आमदाराचे नाव सांगा, असे आव्हान शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आज दिले.
गुहावाटीला गेल्यापासून गेल्या सात दिवसात शिंदे आज पहिल्यांदाच माध्यमांशी बोलले. शिवसेनेकडून खोटा प्रचार करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, आमच्यात इथे कोणताही संभ्रम नाही. सारेजण आनंदात आहेत. त्यामुळे असा खोटा प्रचार करण्यापेक्षा संपर्कात असलेल्या एकातरी आमदाराचे नाव सांगा असे आव्हान त्यांनी ठाकरे यांना दिले.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यात नवे सरकार स्थापन करण्याच्या तयारीला लागले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्याकडून तशा हालचाली सुरू झाल्या आहेत. फडणवीस आज दिल्लीला पोचले आहेत. फडणवीस यांची गेल्या आठ दिवसातली ही सातवी दिल्ली भेट असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात लवकरच फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार येणार असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. त्या अनुषंगाने फडणवीस दिल्ली भेटीवर असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना समोरा समोर बसून चर्चेतून मार्ग काढू, असे आवाहन केले आहे. आमदारांना आवाहन करणारे पत्र ठाकरे यांनी आज प्रसिद्धीस दिले. दरम्यान, शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माध्यमांशी व्हिडिओच्या माध्यमातून बोलताना शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या भाषेवर आज पुन्हा आक्षेप घेतला. खासदार संजय राऊत अत्यंत वाईट पद्धतीने बोलत असल्याची टीका त्यांनी केली. आम्ही कोणत्याही पक्षात गेलेलो नाही. जाणार नाही. आम्ही सर्वजण शिवसेनेतच आहोत. शिवसेना हीच आमची संघटनांनी आणि पक्ष आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी आम्ही कधीच फारकत घेऊ शकत नाही, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.