Jalgaon ST bus theft : चोरीच्या अनेक घटना तुम्ही याआधी ऐकल्या असतील. पण, एसटी स्टॅण्डमधून चक्क एसटी बस चोरीला गेल्याची घटना तुम्ही कधी ऐकली नसेल. मात्र, तसं घडलं आहे. जळगाव जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या जामनेर आगारातून चक्क नवी कोरी बस चोरीला गेली.
जामनेर आगाराची नवी कोरी एसटी बस (ST BUS) अज्ञात चोराने मध्यरात्री पळवून नेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एमएच १९, एनई ४२१४ क्रमांकाची ही बस रविवारी रात्री सुमारे अडीच वाजता आगारातून गायब झाली. त्यामुळे एसटी महामंडळासह जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.
बसचा शोध घेतला असता, ती जामनेर तालुक्यातील शहापूर गावाजवळील खडकी नदीच्या फरशी पुलावर बंद अवस्थेत आढळून आली. बसचे पुढील चाक पंक्चर झाल्याने चोरट्याने ती तेथेच सोडून पळ काढल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. बसचे चाक पंचर झाल्यामुळे चोरट्याचा प्लॅन फसल्याचे दिसत आहे.
चोरीची ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान, आगार व्यवस्थापक दिनेश नाईक यांच्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरोधात तक्रार नोंदविण्यात आली आहे. आगार परिसरातील CCTV कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये संशयित चोर कैद झाल्याची माहिती आगार व्यवस्थापकांनी दिली आहे. त्यामुळे पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संशयिताची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
शहापूर गावातील ग्रामस्थांना सोमवारी सकाळी खडकी नदीवरील फरशी पुलावर एसटी महामंडळाची बस उभी असल्याचे दिसले. गावातील रस्त्यावर अशा प्रकारे बस उभी असल्याचे पाहुन गावातील लोकांमध्ये कुतूहल निर्माण झाले. जळगाव-नेरी-जामनेर धावणारी सदरची बस जामनेर आगाराची असल्याचे समोर आले आणि बस कुणीतरी पळवून नेल्याची माहिती समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, या घटनेने आगाराच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बस आगारातून बाहेर गेलीच कशी, कुणाला त्याची चाहुल कशी लागली नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे बसच्या चाव्या संशयिताच्या हाती कशा लागल्या, असे अनेक प्रश्न पडले असून याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. पोलीस तपासातून संशयिताची ओळख आणि त्याने बस शहापूरपर्यंत का नेली, याचा उलगडा होण्याची अपेक्षा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.