Karan Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Lok Sabha 2024: शिवसेनेची उमेदवारी मिळताच, करण पवारांनी भाजपचं केलं ऑपरेशन

Jalgaon Lok Sabha 2024: "भाजपचे आव्हान निश्चितच आहे. भाजपकडे पैसा आहे. सत्ता आणि दबावतंत्र आहे, मात्र काहीही आव्हान असले तरी, ही निवडणूक लढणार आणि जिंकणारच. भाजप नेत्यांच्या दबाव तंत्राला पक्षातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी कंटाळले आहेत."

Sampat Devgire

Jalgaon Lok Sabha 2024 Election: करण पवार (Karan Pawar) यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. लगोलग त्यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे (Jalgaon Lok Sabha Constituency) शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांनी भाजप नेत्यांना चांगलेच चिमटे घेतलेत. ते म्हणाले, आमच्या पुढे भारतीय जनता पक्षाच्या (BJP) उमेदवाराचे आव्हान आहे असे आम्ही मानत नाही. स्मिता वाघ (Smita Wagh) या उमेदवार म्हणून शेवटपर्यंत राहतात की, अचानक त्यांची उमेदवारी रद्द होते हे पाहावे लागेल.

स्मिता वाघ यांचे तिकीट राहते की जाते, याची त्यांना स्वतःलाच शाश्वती नाही. कारण भाजपमध्ये काहीही होऊ शकते. भाजमधील (BJP) नेत्यांच्या या लहरीपणाचा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना कंटाळा आला आहे. भाजपने आजवर या निवडणुका जिंकल्या. त्याला शिवसेनेची जोड होती. शिवसेनेच्या बळावरच भाजपला मोठे मताधिक्य मिळत होते, असा दावा पवार यांनी केला. ते म्हणाले, शिवसेनेतील (Shivsena) काही नेते निघून गेले आहेत. मात्र, कार्यकर्ते आणि एकनिष्ठ लोक अद्यापही पक्षात टिकून आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गट आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांची गेली आठवडाभर चर्चा सुरू आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उमेदवारी दिली, त्यामुळे त्यांचा विशेष आभारी आहे. खासदार संजय राऊत हे आमचे आदर्श आहेत. जनमानसात भाजपविरोधी लाट आहे, त्यामुळे जळगाव मतदारसंघात इतिहास घडणार आहे. ही निवडणूक आम्ही शंभर टक्के जिंकू यात अजिबात शंका नाही.

भाजपचे आव्हान निश्चितच आहे. भाजपकडे पैसा आहे. सत्ता आणि दबावतंत्र आहे, मात्र काहीही आव्हान असले तरी, ही निवडणूक लढणार आणि जिंकणारच. भाजप नेत्यांच्या दबाव तंत्राला पक्षातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी कंटाळले आहेत. केवळ दबावामुळे त्यांना पक्ष सोडता येत नाही. ही सर्व मंडळी आम्हाला मदत करतील, असा दावादेखील पवार यांनी केला.

जळगाव मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार उमेश पाटील यांना उमेदवारी नाकारली. येथून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्याचे तीव्र पडसाद या मतदारसंघात उमटल्याचं दिसत आहे. भाजपला सोडचिठ्ठी देत खासदार उमेश पाटील यांनी शिवबंधन हाती बांधले आहे. त्यातूनच करण पवार यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता भाजपसमोर बंडखोरीचे मोठे आव्हान आहे. अशा स्थितीत जळगावची निवडणूक अतिशय रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. त्याची चुणूक शिवसेनेचे उमेदवार करण पवार यांनी दाखवून दिली आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT