Girish Mahajan & Gulabrao Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MLC Election News : विधानपरिषदेचा धुराळा : जळगावमध्ये गुलाबराव पाटील मुलासाठी उमेदवारी खेचून आणणार की, भाजप बाजी मारणार?

Jalgaon MLC Election News : विधान परिषदेवर निवडून द्यायच्या रिक्त असलेल्या जागांसाठी निवडणुकीची घोषणा झाली आहे. जळगावात प्रताप पाटील, डॉ. केतकी पाटील, नंदू महाजन, अडवानींसह अमोल शिंदेंचे नाव चर्चेत आहे.

Ganesh Sonawane

Jalgaon Politics : महाराष्ट्रातील सतरा विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था या मतदारसंघाचाही समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या निवडणुकीची उत्सुकता लागून होती. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.

विधान परिषदेचे माजी आमदार चंदूभाई पटेल यांचा कार्यकाळ संपला असून रिक्त झालेल्या जागेवर वर्णी लागण्यासाठी इच्छुकांकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, संख्याबळाचा विचार केला असता या निवडणुकीत महायुतीचे बहुमत स्पष्ट व निर्णायक आहे. परंतु या जागेसाठी भाजप व शिवसेना यांच्यात अंतर्गत स्पर्धा आहे. जळगावात जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या नाही. त्यामुळे केवळ नवनियुक्त नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिकेचे नगरसेवक तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष हेच मतदार असणार आहेत.

महायुती विचारविनिमय करुन एकच उमेदवार ठरवेल असा दावा केला जात असला तरी या जागेसाठी शिवसेना व भाजपमध्ये असलेली रस्सीखेच काही लपून नाही.

या जागेवर भाजपचा पारंपरिक दावा असल्याने पक्षातील अनेक नेत्यांनी आधीपासूनच फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली होती. गेल्या दोन दशकांपासून, म्हणजे २००५ मध्ये या जागेवर डॉ. गुरुमुख जगवानी निवडून आल्यापासून सन २०११ ते २०१४ हा अपवाद वगळता ही जागा भाजपच्या ताब्यात राहिलेली आहे. त्यामुळे भाजपचा या जागेसाठी दावा कायम आहे.

भाजपकडून नंदकुमार अडवाणी, माजी जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर महाजन तसेच अमोल शिंदे यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू असतानाच, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील यांचे नावही इच्छुकांच्या यादीत पुढे आल्याने पक्षांतर्गत चुरस आणखी वाढली आहे.

तर दुसरीकडे २००५ च्या आधी या जागेवर सुरेशदादा जैनांचे कट्टर समर्थक शरद वाणी हे आमदार होते.. त्यामुळे शिवसेना हा मुद्दा सांगून या जागेवर दावा करु शकते. शिवसेनेतर्फे (शिंदे गट) जिल्ह्याचे पालकमंत्री व जेष्ठ नेते गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांचे नाव प्रमुख दावेदार म्हणून पुढे येत आहे. दरम्यान, वाढदिवसाच्या दिवशी प्रताप यांचे जळगाव शहरात भावी आमदार म्हणून बॅनर लागल्याने जळगावच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं होतं.

स्वत: गुलाबराव पाटील देखील आपल्या मुलाला आमदार करण्यासाठी चांगलेच इच्छुक आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय या दोन जमेच्या बाजू ते जागा पदरात पाडून घेण्यासाठी व मुलाच्या उमेदवारीसाठी वापरु शकता.

याशिवाय या मतदारसंघातून शिवसेनेने यापूर्वी दोनदा निवडणूक लढविल्याने ‘तिसऱ्यांदा शिवसेना’च असा मुद्दा पुढे करत पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रतापराव पाटील यांच्या रूपाने प्रभावी चेहरा मैदानात असल्याने सध्या तरी शिवसेनेचे पारडे जड मानले जात असून, भाजपसमोर उमेदवारीबाबत नवा पेच उभा राहिला आहे.

पक्षीय बलाबल असे..

जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील एकूण ४८२ जागांमध्ये महायुतीचे स्पष्ट वर्चस्व दिसून येत आहे. पक्षनिहाय आकडेवारीनुसार भाजपचे १७१ नगरसेवक, शिवसेनेचे १२०, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे २४, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ३३ नगरसेवक आहेत. काँग्रेसचे २१, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ३ आणि एमआयएमचे ३ नगरसेवक निवडून आले आहेत.

तसेच महाराष्ट्र जन विकास आघाडीचे १५, धरणगाव शहर विकास आघाडीचे ९, अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचे १२, शहर विकास आघाडीचे १०, शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडीचे २, जनआधार विकास पार्टीचे ३, सुराज्य परिवर्तनचे २, तर ५४ अपक्ष नगरसेवक आहेत. अशा प्रकारे एकूण ४८२ सदस्यांचे पक्षीय चित्र स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, जळगाव महानगरपालिकेतील ७५ नगरसेवकांच्या पक्षीय बलाबलातही भाजपचे वर्चस्व कायम असल्याचे दिसून येते. भाजपचे ४६, शिवसेनेचे २२, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ५, राष्ट्रवादी काँग्रेसचा १ आणि १ अपक्ष नगरसेवक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT