Jitendra Awhad news Sakarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon News : जळगावात पोलिसांच्या क्रूरतेचा कहर ! ३ मुलांना पट्टयाने मारहाण, नग्न करुन लैंगिक चाळे..

Jalgaon police brutality : राष्ट्रवादी(शरदचंद्र पवार)पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणाला वाचा फोडली आहे. त्यांनी एक्स पोस्ट करुन या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे.

Ganesh Sonawane

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तक्रारदारांच्या आरोपावरुन पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नाऱ्हेडा यांनी तीन तरुणांना संशयित म्हणून पकडून आणलं. पकडलेल्या भिल्ल समाजाच्या मुलांना पट्ट्याने अमानुषपणे मारहाण करुन त्यांना परस्परांशी लैंगिक चाळे करायला लावले. या प्रकरणी बहुजन समाज पार्टीने तक्रार दिली. त्यानंतर संबंधित पोलिस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आलं. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात एक्स पोस्ट करुन माहिती दिली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी पुढे म्हटलं आहे की, एका गुन्ह्याप्रकरणात संशयावरुन ताब्यात घेतलेल्या भिल्ल समाजाच्या मुलांना पट्ट्याने अमानुषपणे मारहाण करणाऱ्या आणि परस्परांशी लैंगिक चाळे करण्यास भाग पाडण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भिल्ल समाजाच्या तीन तरुणांना अंगावरचे कपडे काढून नग्न व्हायला सांगून एकमेकांसोबत लैंगिक चाळे करायला भाग पाडल्याचा घाणेरडा प्रकार पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस ठाण्यात केल्याचे म्हटले जात आहे. एका महिलेला सुद्धा अश्लील शिवीगाळ करून तिला मारहाण केल्याची तक्रार महिलेने केली आहे.

जितेंद्र आव्हाड आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणतात की, पोलीस उपनिरीक्षकांचे नाव सज्जनसिंह नार्हेडा असून या घटनेनंतर त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. या गंभीर घटनेनंतर संबंधित पीडित तरुणांच्या कुटुंबियांनी तसेच एकलव्य संघटनेने तक्रार केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करुन त्याची चौकशी करण्यात येत आहे.

चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या संशयावरून या तिघा तरुणांना पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस ठाण्यात बोलावले होते. त्यानंतर तिन्ही तरुणांना पट्ट्याने अमानुषपणे मारहाण करत एकमेकांसोबत लैंगिक चाळे करायला भाग पाडल्याचा आरोप या तरुणांनी केला आहे.

दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेसंदर्भातला सविस्तर अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना दिला आहे. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संबधित पोलीस अधिकाऱ्याची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नाऱ्हेडा यांच्यावर गेल्या दोन वर्षांपूर्वी राहुरी पोलीस ठाणे येथे त्यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशा पार्श्वभूमीवर, त्यांच्याकडून पुन्हा अशा प्रकारचा गैरवर्तन झाल्याचा आरोप अत्यंत गंभीर मानला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT