Janata Dal leaders Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maharashtra Politics : मालेगाव शहरात निहाल अहमद यांच्या जनता दलाचा राजकीय अस्त!

Sampat Devgire

Malegaon Politics : गेली पन्नास वर्षे मालेगाव शहराच्या राजकीय, सामाजिक प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या (कै) निहाल अहमद यांची ओळख समाजवादी विचारधारेचा नेता अशी होती. त्यांच्या दुसऱ्या पिढीनेदेखील जनता दल या त्यांच्या पक्षाचा झेंडा फडकवत ठेवला होता. (Socialist ideology leaders of Janata Dal joined Samajwadi Party)

मालेगाव (Malegaon) शहराला राज्याच्या (Maharashtra) राजकारणात विशेष ओळख आहे. येथे जनता दलाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षाची शाखा बरखास्त केली. या सर्वांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे.

मालेगाव, समाजवादी विचारधारेचा जनता दल आणि (कै) निहाल अहमद यांचे एक अतूट राजकीय नाते होते. प्रारंभी समाजवादी, त्यानंतर जनता पार्टी आणि त्यानंतर जनता दल हा येथील राजकीय पक्षाचा प्रवास होता. या शहराच्या राजकारणावर निहाल अहमद यांचा विशेष प्रभाव राहिला आहे. सलग सात वेळा ते आमदार म्हणून निवडून आले होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेतेदेखील होते.

मालेगाव शहरात महापालिका स्थापन झाल्यावर ते पहिले महापौर झाले. पुढे निहाल अहमद यांच्या निधनानंतर बदलत्या काळाच काँग्रेस आणि एमआयएम पक्षाचा शहरात प्रभाव वाढला. गेल्या महापालिका निवडणुकीत जनता दलाने एमआयएम पक्षाशी युती केली होती. त्यात त्यांचे सात नगरसेवक विजयी झाले. सध्या जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे नेतृत्व (कै) निहाल अहमद यांच्या कन्या शानेहिंद करीत होत्या.

राज्यातील जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाच्या राज्य व जिल्हास्तरीय नेत्यांनी मुंबई येथे बुधवारी समाजवादी पक्षात प्रवेश केला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आसीम आझमी यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करतानाच त्यांना पक्षात काम करण्यासाठी मुक्त वातावरण निर्माण करून देऊ. त्याचवेळी त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपविल्याची घोषणा आझमी यांनी या वेळी दिली.

मुंबई येथील प्रवेश सोहळ्यात प्रताप होगाडे, येथील महिला नेत्या साजेदा निहाल अहमद, शानेहिंद निहाल अहमद, मुश्‍तकीम डिग्निटी, माजी उपमहापौर रशीद येवलेवाले, जावीद अन्वर या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह रेवण भोसले, डॉ. पी. डी. जोशी, डॉ. विलास सुरकर, शिवाजीराव परुळेकर, नंदेश अंबाडकर, कुमार राऊत आदींनी प्रवेश केला. यातील होगाडे यांच्यावर प्रदेश कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. साजेदा अहमद यांची प्रदेश महासचिव व प्रदेश अल्पसंख्याक सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मुश्‍तकीम डिग्निटी यांची युवा जनसभा प्रदेश महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी भाजपशी युती केल्याने आम्ही जनता दलाला सोडचिठ्ठी दिली. संविधान बरोबरच शरीयत वाचविण्यासाठी समाजवादी पक्षात प्रवेश केल्याचे शानेहिंद निहाल अहमद यांनी या वेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT