Devendra Phadanvis & Manoj Jarange Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: जरांगेंनी फडणवीसांना शिंगावरच घेतला... तर भाजप संपवायला वेळ लागणार नाही!

Sampat Devgire

Jarange Patil News: मराठा आरक्षणाचा लढा हा राज्यातील गरजवंतांचा लढा आहे. या समाजाला आणि गोरगरीब जनतेला आरक्षण हवे आहे. मात्र सत्ताधारी महायुती आणि भाजप नेते त्याबाबत कारस्थाने करीत आहेत.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा समारोप आज नाशिकला झाला. यावेळी त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. या रॅलीत जरंगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना थेट इशारा दिला.

जरांगे पाटील यांनी आज मराठा आरक्षण आंदोलनाचा सविस्तर आढावा सादर केला. ते म्हणाले, आम्ही राज्य शासनाकडे आरक्षण मागितले होते. एसईबीसी हे आरक्षण कधीच मागितले नव्हते. ते शासनाने आम्हाला दिले. पुढे ते रद्द देखील केले.

गरजवंत मराठा समाजाला जे आरक्षण आहे ते देणार नाही, अशी अप्रत्यक्ष कृती उपमुख्यमंत्री फडणवीस करीत आहेत. कुणही म्हणजेच मराठा आहे, हे जिल्ह्या जिल्ह्यातील नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आम्ही ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण घेऊ.

जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांचा चांगलाच समाचार घेतला. फडणीस यांनी आंतरवेली सराटी येथे आमच्या समाजाच्या निरपराध युवक, महिलांवर लाठ्या, काठ्या चालवल्या. बंदुकीच्या गोळ्या झाडल्या. अक्षरशा महिलांच्या डोक्याच्या चिंधड्या उडवल्या.

एव्हढा अन्याय झाला तरीही आम्ही काहीच बोलायचे नाही, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस करीत आहेत. मी त्यांच्याकडे आरक्षण मागितले. त्यांनी माझी चौकशी सुरू केली. एवढ्या वर थांबले नाही. त्यांनी राजकीय कारस्थाने सुरू केली आहेत.

अद्यापही आम्ही मात्र त्यांना वेळ देत आहोत. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावे. दिले नाही तर या सरकारचे काय करायचे हे समाज ठरविल. येत्या २९ ऑगस्टला राज्यभरातील मराठा समाज अंतरवेली सराटी येथे एकत्र येईल. यावेळी लढायचे की पाडायचे याचा निर्णय घेण्यात येईल.

जरांगे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कारस्थाने करून अनेक लोकांना संपवले, असा आरोप त्यांनी केला. मात्र फडणवीस यांना मराठा समाजाचा अनुभव नाही. हा समाज एकत्र येत नाही. कधी एकत्र आला तर समोरच्याला शिल्लक ठेवत नाही. त्यामुळे फडणवीस यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा.

सध्या फडणवीस मंत्री भुजबळ यांच्या मागे मागे चालले आहेत. मंत्री छगन भुजबळ जबळ यांचे सबंध राजकीय आयुष्य इकडून तिकडे उड्या मारण्यात गेले. या राजकारणात त्यांनी स्वतःचे उखळ पांढरे करून घेतले. आधी शिवसेना संपवली. मग राष्ट्रवादी काँग्रेस संपवली आणि आता ते देवेंद्र फडणवीस यांना संपवल्याशिवाय राहणार नाही.

श्री फडणवीस यांनी भुजबळांचे त्यांचे ऐकून मराठा समाजाला आरक्षण देण्याचे टाळले, तर त्यांचे काय करायचे हे आम्हाला चांगले माहित आहे. आम्हाला फसवले, आरक्षण दिले नाही तर देवेंद्र फडणवीस माझा तुम्हाला इशारा आहे. महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टी अस्तित्वालाही शिल्लक राहणार नाही.

मराठा समाज आरक्षणाच्या विषयावर अतिशय संवेदनशील आहे. त्यांची थट्टा करण्याचा किंवा आश्वासने देऊन बोळवण करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, तो यशस्वी होणार नाही.

नाशिक येथे आज शांतता रॅलीचा समारोप झाला. यावेळी नाशिक शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाच्या चौकात व्यासपीठ उभारण्यात आले होते. रस्त्याच्या दुतर्फा ध्वनिक्षेपके लावण्यात आली होती. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्याचे नियोजन केले होते.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT