Kopargaon law and order : कोपरगावमधील दंगल अन् पोलिसांवर हात उचलण्याच्या प्रकरणातील गुन्ह्यात महिन्याभरापासून पसार असलेला आमदार आशुतोष काळे यांचे स्वीय सहाय्यक अरुण जोशी याच्यासह तिघे पोलिसांना शरण आले.
या तिघांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठापर्यंत धावाधाव केली. परंतु सर्वच पातळीवर अपयश आल्यानंतर पोलिसांसमोर शरण आले. या तिघांना आता न्यायालयात हजर करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे,.
कोपरगाव (Kopargaon) शहरात 25 सप्टेंबरला रात्री 11.15 वाजेच्या सुमारास अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोपरगावमधील आमदार आशुतोष काळे यांचे समर्थक, मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षातील समर्थकांमध्ये दंगल झाली. दोन्ही बाजूने तलवार, लोखंडी राॅड, क्रिकेटचे स्टंप, लाकडी काठ्या, दगड, विटांची फेकाफेक झाली.
या दंगलीत पोलिस (Police) कर्मचारी यमानाजी सुंबे, ज्ञानेश्वर भांगरे यांच्यासह विवेक आव्हाड, गौरव मोरे, अविनाश गीते, दत्तात्रय पंडोरे, हिराबाई आव्हाड, तर दुसऱ्या गटातील सुनील गोर्डे, वनिता गोर्डे, अरुण जोशी, राजेंद्र जोशी, शुभम जोशी यांच्यासह 10 जण गंभीर जखमी झाले होते.
यातील 41 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता, तर त्यानंतर सरकारी कामात अडथळा आणला प्रकरणी अन्य 19 आरोपीवर, असे एकूण 60 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. अटक करण्यात आलेल्या 18 जणांना नुकताच, म्हणजे 17 ऑक्टोबरला न्यायालयाने जामीन मंजूर केला.
पोलिसांवर हात उचलणारे आमदार आशुतोष काळे यांचे स्वीय सहाय्यक अरुण जोशी, त्याचा भाऊ राजेंद्र जोशी आणि त्यांचा पुतण्या शुभम जोशी यांनी कोपरगाव इथल्या जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला होता. या तिघांच्या जामिनासाठी नाशिक मधील विशेष वकिलाची नेमणूक करण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायालयाने तो अटकपूर्व जामीन फेटाळला होता.
यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली. दोन्ही बाजूंचा युक्तिवादानंतर न्यायालयाने, 'तुम्ही अर्ज काढून घेणार की, मला तो फेटाळावा लागेल', अशी सूचना केली. यानंतर या तिघांनी अर्ज काढून घेतला. यानंतर अरुण जोशी, राजेंद्र जोशी, शुभम जोशी हे तिघं आज पोलिसांसमोर शरण आले.
दरम्यान, भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी आमदार आशुतोष काळेंवर पूर्वी निशाणा साधताना, 'या 40 वर्षांमध्ये आम्ही काय केलं हे जनतेला माहिती आहे, परंतु आमच्या कोणत्याही स्वीय सहायकाने पोलिसांच्या कानशिलात लगावली नसल्याची देखील बाब खरी आहे. आमदाराच्या स्वीय सहायकाने पोलिसांना मारावं इथपर्यंत मजल गेलेली आहे, हे मी नाही, तर पोलिस ठाण्यात नोंद झालेली तक्रार सांगते,' अशी खोचक टोला लगावला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.