Devendra Fadnavis, Vijay Kumbhar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kumbh Mela Nashik : कुंभमेळा सुरू व्हायच्या आधीच ‘भ्रष्टाचाराची डुबकी?’ CCTV प्रकल्पावरून आम आदमी पक्षाचे गंभीर आरोप

Aam Aadmi Party Vijay Kumbhar : नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा अवघ्या दीड वर्षांवर येऊन ठेपला आहे. पण त्यापूर्वीच भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहे. थेट फडणवीसांना 'आप'ने जाब विचारला आहे.

Ganesh Sonawane

Nashik Kumbh Mela : नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा अवघ्या दीडवर्षांवर येऊन ठेपला आहे. त्यादृष्टीने प्रशासनाच्या तयारीला वेग आला आहे. एकीकडे कुंभमेळ्याच्या कामांसाठी असलेली ठेकेदारी वादात सापडली आहे. तर दुसरीकडे कुंभमेळ्याच्या आधीच भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले आहे. आम आदमी पक्षाने कुंभमेळ्यासाठी बसविल्या जाणाऱ्या सीसीटिव्हीच्या कामात अनियमितता झाल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली आहे.

आम आदमीचे उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी सीसीटिव्हीच्या कामात अनियमितता झाल्याचा आरोप केला असून थेट मुख्यमंत्री फडणवीसांना त्यासंदर्भात पत्र लिहलं आहे व यांदसर्भात जाब विचारला आहे. २०१५ मध्ये नाशिक कुंभमेळा सीसीटीव्ही प्रकल्प फक्त ९.९४ कोटींमध्ये पूर्ण झाला होता, तर यावेळी तेच काम २९४ कोटींना मॅट्रिक्स कंपनीला देण्यात आल्याचा आरोप आम आदमीचे उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी केला आहे. खर्च जवळपास ३० पट वाढला असून यामागील कारणांमध्ये कोणतीही पारदर्शकता दिसत नाही. यासंदर्भात न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी आम आदमीने केली आहे.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक कुंभ नगरीत भाविकाची प्रचंड गर्दी होईल. भाविकांची सुरक्षितता व गर्दी नियंत्रणासाठी सीसीटिव्ही बसविले जाणार आहे. कुंभार यांचे म्हणणे आहे की, अंदाजे प्रति-कॅमेरा एकूण खर्च 7.7 लाख इतका केला जाणार आहे. हा खर्च अतिप्रचंड आहे. कॅमेरे, नेटवर्क उपकरणे आणि इंस्टॉलेशनचे दर बाजारभावाच्या तुलनेत प्रचंड वाढवून दाखविण्यात आले आहेत. काही घटकांमध्ये दरवाढ २ ते २० पट इतकी आहे. कुंभमेळ्याच्या ३० दिवसांसाठी हा सुमारे ३०० कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. म्हणजे प्रतिदिन १० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

पूर्वीची चौकशी अपूर्णः

२०१५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक कुंभमेळ्याच्या सीसीटिव्ही प्रकल्पाच्या अनियमिततेवर चौकशीचे आदेश दिले होते. मुंबईतील एका कंपनीला त्यावेळी ९.४४ कोटींचे टेंडर दिले होते. नियमांकडे दुर्लक्ष, सिंगल बीड मंजुरी व इतर आरोपांवर विरोधकांनी न्यायालयीन चौकशीची मागणी केली होती. शासनाला त्यावेळी कायमस्वरूपी सीसीटिव्ही बसवायचे होते, परंतु, तीन महिन्यांत शक्य नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात सीसीव्ही बसवल्याचे सांगितले होते.

परंतु आता अकरा वर्षांनंतरही कायमस्वरूपी सीसीटिव्ही बसविलेच नाही. फक्त कॅमेरे बसविण्याचा खर्च ९.४४ कोटींवरून २९४ कोटींवर गेल्याने चौकशीचे काय झाले. त्या चौकशीचा अहवाल आजपर्यंत सार्वजनिक झालेला नाही.जबाबदारी कुणाची असा सवाल आम आदमी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी केला.

नाशिक व त्र्यंबकेश्वर कुंभ 2027 सीसीटीव्ही प्रकल्पाची स्वतंत्र व तांत्रिक लेखापरीक्षण चौकशी करण्यात यावी. Matrix Smart Technologies Pvt. Ltd. व EY सल्लागार संस्था यांच्या भूमिकेची व लाभांची तपासणी करण्यात यावी. प्रकल्पातील निविदा प्रक्रिया, दरनिश्चिती, व देयक तपशील सार्वजनिक करण्यात यावेत. २०१५ साली आदेशित चौकशीचा अहवाल तात्काळ जाहीर करण्यात यावा. अशा सर्व शासन प्रकल्पांसाठी बाजारभाव तुलना व दरनिश्चिती धोरण बंधनकारक करण्यात यावे अशी मागणी उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी केली आहे.

राज्याच्या निधीचा वापर करून अशा प्रचंड दरवाढीच्या व अपारदर्शक प्रक्रियांमुळे लोकशाहीच्या मूलभूत पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात झालेला खर्च, दरनिश्चिती व प्रक्रिया यांचे स्वतंत्र व न्यायालयीन परीक्षण करणे आवश्यक आहे. आपण हस्तक्षेप करून चौकशी करून सर्व संबधितांवर कारवाई करावी आणि सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. दरम्यान कंपनीने कुंभार यांचे आरोप फेटाळले असून पुरावे दिले तर नक्की चौकशी करू असे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT