Lalita Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Lalita Patil News : अमळनेर भाजपच्या ललिता पाटील यांनी हाती बांधले 'शिवबंधन'

Lalita Patil Joins Shivsena : लोकसभा निवडणुकीअगोदरच काँग्रेसमध्ये जाणार असल्याबाबतचीही चर्चा होती.

कैलास शिंदे

Jalgaon Lok Sabha Constituency : भारतीय जनता पक्षाच्या अमळनेर येथील पदाधिकारी ललिता पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना ठाकरे गटाचे 'शिवबंधन' हाती बांधले. मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या निवासस्थानी त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे.

मुंबईत झालेल्या पक्ष प्रवेशाच्या सोहळ्यासाठी शिवसेना नेते खासदार संजय राऊत(Sanjay Raut), जिल्हासंपर्क प्रमुख संजय सावंत, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, विराज कावडीया, महानगर प्रमुख शरद तायडे, वैशाली सूर्यवंशी, जिल्हा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ आदी उपस्थितीत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ललिता पाटील यांच्या पक्ष प्रवेशाचे स्वागत केले. जळगाव लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत शिवसेना(Shivsena) ठाकरे गटाकडे आहे. प्रथमच पक्षातर्फे ही निवडणूक लढविण्यात येणार आहे. पक्षाचा उमेदवार विजयी करण्यासाठी पक्षातर्फे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, जळगाव लोकसभा मतदारसंघात आपल्या पक्षाचा उमेदवार महाविकास आघाडीच्या माध्यमातून विजयी करायचाच आहे. त्यासाठी सर्वांनी ताकदीने कामाला लागले पाहिजे, भाजपला पराभूत करायचेच या निश्‍चयाने सगळ्यांनी कामाला लागावे.

ललिता पाटील या मूळ काँग्रेस पक्षाच्या आहेत, त्यांनी काँग्रेसमध्ये विविध पदे भूषविली आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. पक्षातर्फे त्यांना पक्षाचे महिला आघाडीचे समन्वयक पद देण्यात आले होते. तरीही त्या पक्षात फारशा सक्रिय दिसून आल्या नाहीत. त्या पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू होती. काँग्रेसमध्ये जाणार असल्याबाबतही चर्चा होती.

राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना अमळनेर येथे शरद पवार(Sharad Pawar), अजित पवार, जयंत पाटील एका कार्यक्रमास आले होते. त्यावेळी त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची चर्चा होती. मात्र, त्यांचा प्रवेश झालेला नाही. आता लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. भारतीय जनता पक्षात उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अशा स्थितीत त्या ठिकाणी उमेदवारीची संधी मिळण्याची शक्यता कमीच होती.

जळगाव लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाकडे होता. मात्र, आता तो शिवसेना ठाकरे पक्षाकडे जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत या पक्षाकडून उमेदवारी मिळण्यासाठी त्यांनी मागणी केली आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी मुंबई येथे मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्याच वेळी त्यांचा प्रवेश होणार हे निश्‍चित झाले होते. आज त्यांनी मुंबईत मातोश्रीवर पक्ष प्रवेश केला आहे. या वेळी जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी तसेच अमळनेर येथे त्यांचे समर्थकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पक्ष प्रवेशानंतर ललिता पाटील म्हणाल्या की, आपण लोकसभेची उमेदवारी मिळेल म्हणून पक्ष प्रवेश केलेला नाही. जर पक्षाने उमेदवारी दिली तर आपण लढणारच आहोत, परंतु नाही उमेदवारी दिली तरी आपण पक्ष जो उमेदवार देईल, त्याचा जोरदार प्रचार करणार आहोत.

(Edityed by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT