Suresh Vetal Nashik bribery case : नाशिक जिल्ह्यातील देवळा भूमीअभिलेख कार्यालयातील तत्कालीन उपअधीक्षक सुरेश पर्वत वेताळ यांना अवघी चार हजार रुपयांची लाच घेणे भोवले आहे.
शेतगटाच्या नकाशातील चुकीची नोंद दुरुस्त करून मूळ प्रकरण पुढील कारवाईसाठी पाठविण्यासाठी त्यांनी चार हजारांची लाच घेतली होती. याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले असून जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. कथारे यांनी तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच ३ हजार रुपयांचा दंडही ठोठावला.
तक्रारदाराच्या देवळा तालुक्यातील मौजे चिंचवे येथील शेतगटाच्या एकत्रीकरण योजनेतील नकाशात चुकीची नोंद झाली होती. ही नोंद दुरुस्त करून मूळ प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यासाठी सुरेश वेताळ याने तक्रारदाराकडे चार हजारांच्या लाचेची मागणी केली होती.
यासंदर्भात तक्रारदाराने ACB कडे तक्रार केली होती. त्यानुसार ३० मार्च २०१२ ला पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. तडजोडीनंतर भूमिअभिलेख कार्यालय, देवळा येथील आपल्या दालनात लाचेची रक्कम स्वीकारताना वेताळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते.
देवळा पोलिस ठाण्यात याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पूर्ण झाल्यानंतर १४ मार्च २०१४ ला नाशिकच्या विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सरकारी अभियोक्ता विजय गायकवाड आणि शिरीष कडवे यांनी सरकारी पक्षातर्फे बाजू मांडली.
सादर करण्यात आलेले पुरावे आणि युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. कथारे यांनी सुरेश वेताळ यास तीन वर्षांच्या कारावासाची व तीन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणी पोलिस निरीक्षक राहुलकुमार नाईक, कोर्ट पैरवी अंमलदार प्रदीप काळोगे, हवालदार प्रफुल्ल माळी आणि विलास निकम यांनी पाठपुरावा केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.