

DJ controversy : सार्वजनिक सण-उत्सवांमध्ये, विशेषत: सध्या गणेशोत्सवात डीजे हवा की नको, यावरुन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी मिरवणुकांमध्ये वाजणाऱ्या कर्णकर्कश डीजे (DJ) आणि लाऊडस्पीकरला विरोध केला. त्यावर एका तरुणाने बापट यांना मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात "डीजे हवा की नको?" या विषयावर जोरदार घमासान आणि जाहीर चर्चा सुरू झाली.
राजकीय नेते देखील याविषयावर आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही बापट यांच्यावर झालेला हल्ला योग्य नसल्याचे म्हणत बापट यांच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील थेट विरोधाची भूमिका न मांडता या मुद्द्यावर तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली. तसेच भाजपचे जलसंपदा मंत्री व नाशिकचे पालकमंत्री असलेल्या गिरीश महाजन यांनीही डीजेवर थेट बंदीची मागणी न करता नियमांमध्ये डीजे वाजविण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे.
दुसरीकडे, भाजपचे नाशिक शहराध्यक्ष सुनिल केदार यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या मताविरुध्द भूमिका घेत डीजे आणि लेझर शो नकोच...ते बंद झाले पाहिजेत, त्या ऐवजी पारंपारिक वाद्यांचा वापर करावा अशी भूमिका घेतल्याने भाजपमध्येच या विषयावर मतभिन्नता असल्याचे दिसून येत आहे.
गिरीश महाजनांचे म्हणणे काय?
डीजेच्या मोठ्या आवाजामुळे ध्वनीप्रदुषण होतं. वृद्ध, आजारी व्यक्ती आणि लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर त्रास होतो, ही वस्तुस्थिती आहे. पण शेवटी आमचा सण आहे. ही आमची संस्कृती आहे, कल्चर आहे. कायद्यातील नियमांचे आणि आवाजांच्या मर्यादांचे पालन करुन डीजे वाजविण्यास हरकत नसल्याचे महाजन यांनी म्हटले आहे. डीजे वाजवू नका, असं मी म्हणणार नाही. आवाजाच्या काही मर्यादा पाळून सार्वजनिक गणेश मंडळांनी आणि कार्यकर्त्यांनी डीजे वाजवायला हरकत नाही अशी भूमिका महाजनांनी मांडली.
शहराध्यक्ष सुनिल केदार म्हणतात डीजे व लेझर शो नकोच
गणेशोत्सवात डीजे हवा की नको यावर सध्या महाराष्ट्रात वादंग सुरू आहे. यावरून दोन टोकाच्या भूमिका व्यक्त होत आहेत. डीजे किंवा गाण्यांचा आवाज किती असावा याबाबत नियमावली आहे. पण काही अतिउत्साही मंडळी ऐकत नाहीत. आपल्याच मंडळाकडे लोक कसे आकर्षित होतील याकरिता असे लोक डीजे व गाण्यांचा कानठळ्या बसतात व छातीत धड धड होते. इतक्या मोठ्या आवाजात कार्यक्रम करतात. लेझर शो बाबतही असेच आहे. डोळ्यांना इजा होतील अशा प्रकारे लेझर शो दाखवतात. हे सर्व बंदच झाले पाहिजे त्यापेक्षा पारंपरिक वाद्ये वाजवून उत्सव साजरे केले पाहिजे असं सुनिल केदार यांनी म्हटलं आहे.
वास्तविक आवाज किती डेसिबल असावा याबाबत नियमावली आहे. त्यापेक्षा जास्त आवाज आढळल्यास पोलिसांनी तात्काळ त्याच ठिकाणी आवाज बंद करून त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांकडे लोकांनी सुध्दा फिरकू नये,अघोषित बहिष्कार टाकावा, निषेध करावा, जनजागृती करावी जेणेकरून अशा अतिउत्साही मंडळींना अद्दल घडेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.