Ahilyanagar municipal election : अहिल्यानगरमध्ये शिवसेनेच्या राजकारण, संघटनेला शहराच्या मध्यवर्ती भागापासून सुरवात होते. शहराचा मध्यवर्ती भाग हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिल राठोड यांनी शिवसेनेची संघटना बांधताना हा किल्ला मजबूत केला. तसा तो ओळखला देखील जातो.
या महापालिका निवडणुकीत भाजप-अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला हा किल्ला आव्हानात्मक राहिला. भेदता आला नाही. या मुळे निवडणुकीनंतर देखील, 'लय मजबूत अनिलभैय्यांचा किल्ला', अशी चर्चा रंगली आहे.
शिवसेना एकत्र होती, त्यावेळी अहिल्यानगर शहराचा मध्यवर्ती नालेगाव, माळीवाडा व कल्याण रोड परिसरात प्राबल्य राहिलं आहे. ते आजही एकत्रित शिवसेना फुटल्यानंतर दिसते. भाजप-अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस युतीला आव्हानात्मक ठरला. या परिसरातील तीन प्रभागांतून ठाकरे सेनेतून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेत गेलेले नऊ नगरसेवक निवडून आले आहेत, तर भाजपचे दोन व राष्ट्रवादीचा एक नगरसेवक या परिसरात झाला आहे.
सावेडी, बालिकाश्रम रोड, सारसनगर-बुरुडगाव रोड, केडगाव, अशा उपनगरांतून राष्ट्रवादी व भाजप युतीचा बोलबाला असला, तरी मध्य नगर शहरात मात्र, त्यांना पुरेसे प्रतिनिधीत्व मिळाले नसल्याचे शल्य कायम आहे. विशेष म्हणजे, या मध्य शहराच्या परिसरातील गांधी मैदानात भाजपचे (BJP) जिल्हा कार्यालयही आहे. पण तेथील उपक्रम व जल्लोषही या परिसरात भाजपला फारशी मते देऊन गेलेले नाही.
महापालिका निवडणुकीत, अजित पवार राष्ट्रवादीने 27 व भाजपचे 25 जागा मिळवून वर्चस्व मिळवले असले, तरी एकनाथ शिंदे शिवसेनेनेही दहा जागा मिळवून स्वतःचे अस्तित्व दाखवून दिले. शिवाय यापैकी त्यांच्या तब्बल 9 जागा मध्य शहरातील प्रभाग 9, प्रभाग 11 आणि प्रभाग 12 यातील आहेत.
बालिकाश्रम रोड व कल्याण रोड परिसरातील प्रभाग 9 मध्ये संजय शेंडगे, रुपाली दातरंगे व वैशाली नळकांडे यांनी बाजी मारली. या प्रभागात भाजपचे महेश लोंढेच एकमेव नगरसेवक निवडून आले आहेत. नालेगाव परिसरातील प्रभाग 11मध्ये गणेश कवडे व सुनीता गेनप्पा हे एकनाथ शिंदे शिवसेनेचे दोनजण निवडून आले. तसेच या प्रभागात भाजपचे सुभाष लोंढे व राष्ट्रवादीच्या आशा डागवाले यांनी यश मिळवले.
प्रभाग 12 या माळीवाडा परिसरातील प्रभागात भाजप व राष्ट्रवादीला एकही जागा मिळाली नाही. या प्रभागात बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, मंगल लोखंडे व सुरेखा कदम या शिंदे सेनेच्या चार उमेदवारांचा विजय झाला आहे. याव्यतिरिक्त बोल्हेगाव परिसरातील प्रभाग नऊमध्ये शिंदे सेनेचे नवनाथ कातोरे यांनी खळबळजनक विजय नोंदवला आहे.
एकत्रित शिवसेना असताना माजी आमदार अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने नेहमीच राष्ट्रवादीला मध्य नगर शहरात फारसा शिरकाव करू दिला नव्हता. त्यावेळी शिवसेना व भाजपची युती होती. शिवसेनेच्या झंझावातात भाजपचेही उखळ त्याकाळात पांढरे होत होते. पण राठोड यांच्या निधनानंतर मध्य शहरावरील शिवसेनेची पकड ढिली होईल, अशी चर्चा होती. पण ती फोल ठरली आहे.
शिवसेना फुटली, ठाकरे शिवसेनेतून एकनाथ शिंदे शिवसेनेत गेलेल्यांनी मध्य शहरावरील आपली पकड कायम ठेवली आहे. ही पकडच राष्ट्रवादी व भाजपसमोर आव्हानात्मक आहे. बाकी शहराचा विचार केला तर सावेडीच्या उत्तर भागात राष्ट्रवादी, मध्य सावेडीत भाजप, सारसनगर-बुरुडगाव रोडला राष्ट्रवादी व केडगावला संमिश्र यश युतीला आहे. पण मध्य शहरातील अपयशाची सल कायम आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.